महाराष्ट्राची अवस्था गुजरातच्या वाटेवरील पायपुसण्यासारखीच:पैशांच्या बळावर अशी अनेक पायपुसणी निवडून आणली गेली, ठाकरे गटाचा हल्लाबोल
2 hours ago
1
मोदी–शहा–फडणवीस यांनी महाराष्ट्रात दुहीची बीजे पेरली, जाती–धर्मात दरी पाडली, मत विभागणीसाठी छोटय़ा पक्षांना सुपाऱ्या देऊन आपले काम साधले. हाच भाजप विजयाचा ‘फॉर्म्युला’ म्हणता येईल. महाराष्ट्राची अवस्था ही गुजरातच्या वाटेवरील पायपुसण्यासारखीच झाली आहे व त्यामुळे पैशांच्या बळावर अशी अनेक पायपुसणी निवडून आणली गेली, असे ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे. ठाकरे गटाने पुढे म्हटलंय की, भारतीय जनता पक्षाला अन् शिंदेंनायस यात मर्दुमकी वाटत आहे. महाराष्ट्रात भाजपने ऐतिहासिक वगैरे कामगिरी केली असे मोदी म्हणतात. महाराष्ट्राची मर्दानगी, स्वाभिमान मारून शिवरायांच्या महाराष्ट्राला थैलीवाल्यांच्या पायाचे दास बनवले, याचा कुणाला आनंद झाला असेल तर त्यांनी खुशाल विजयाच्या जिलब्या खाव्यात, पण महाराष्ट्र आपला लढाऊ बाणा सोडणार नाही, असे म्हणत टीकास्त्र डागले आहे. नेमके काय आहे अग्रलेखात? ठाकरे गटाने म्हटलंय की, महाराष्ट्राचे निकाल अनाकलनीय आहेत यावर सगळय़ांचेच एकमत बनले आहे. या सगळय़ात स्वतः देवेंद्र फडणवीसदेखील आहेत. भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांना मिळालेल्या छप्परफाड जागा पाहून आपल्यालाही आश्चर्याचा धक्काच बसल्याचे फडणवीस यांनी मान्य केले. महाराष्ट्रातील ‘विजय’ हा त्या सगळय़ांसाठी अभूतपूर्व आहे, पण विजयाचे हे देणे विजयवीरांना नम्रतेने पेलवता येईल काय? निकाल संशयास्पद व रहस्यमय आहेत, तरीही लोकशाहीचा कौल वगैरे मान्य करून ते स्वीकारायचे असतात. भाजप 149 जागांवर निवडणूक लढून 132 जागांवर विजयी झाला. हा त्यांचा स्ट्राईक रेट की काय म्हणायचा तो सनसनाटी आहे. राजकारणातील विद्वान मंडळींना यावर विशेष संशोधन करावे लागेल. लोकसभेला भाजपचा हा ‘रेट’ साधारण 32 टक्के होता, तो चार महिन्यांत 88.59 टक्के झाला. भ्रष्टाचार व लोफरगिरी करण्याच्या अपराधाबद्दल अमेरिकेत न्यायालयाने अटक वॉरंट काढले असताना मुंबईच्या शेअर बाजारात अदानीचा भाव वाढावा तसाच हा प्रकार, पण मोदी है तो सर्व काही मुमकीन असल्याने हे अनाकलनीय निकाल स्वीकारायचे असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रसद भाजपसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात उतरवण्यात आली व महाराष्ट्राच्या निवडणुकीची सूत्रे संघाने आपल्या हातात घेतली. शिवाय गुजरातमधून 90 हजार जणांची फौज महाराष्ट्रात उतरवून भाजपने विजयासाठी गुजरात मॉडेलचा वापर केला. हा खुलासा खुद्द पंकजा मुंडे यांनीच केला. ‘ईव्हीएम’सुद्धा गुजरातमधूनच आणल्या महाराष्ट्रात बाजूच्या गुजरात राज्यातून लाखभर लोक येतात व प्रत्येक मतदारसंघात तळ ठोकून बसतात. याचा काय अर्थ घ्यायचा? (कुणी म्हणतात येथे निवडणुकीत वापरलेल्या ‘ईव्हीएम’सुद्धा गुजरातमधूनच आणल्या.) दोन राज्यांत निवडणुका झाल्या. झारखंडचा निकाल हा हेमंत सोरेन यांच्या बाजूने लावला व महाराष्ट्रासारख्या मोठय़ा व राजकीय, आर्थिकदृष्टय़ा मोठय़ा राज्यावर मोदी-शहांच्या व्यापारी लॉबीने ‘ताबा’ मिळवला. या मंडळींनी लोकशाही मार्गाने महाराष्ट्र राज्य जिंकले यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयात जाऊन जल्लोष केला. ते म्हणतात, ‘‘महाराष्ट्रात नकारात्मक राजकारणाचा पराभव झाला. खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला. खोटेपणा, कपट, विभाजनकारी शक्ती, घराणेशाहीचा पराभव झाला.’’ पंतप्रधान मोदी यांचे हे विधान नक्की कोणासाठी आहे? मुळात भाजपमधीलच अनेक घराणी या निवडणुकीत उतरवली गेली होती. पंतप्रधान मोदी यांना घराणेशाहीची यादी हवी असेल तर ती त्यांनी नारायण राणे, उदय सामंत, आशीष शेलार वगैरे त्यांच्याच लोकांकडून घ्यावी. मोदी व त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रात नकारात्मक प्रचार केला. वायनाडमध्ये मोदींची जादू का चालली नाही? संघाचे प्रचारक घराघरांत जाऊन विद्वेषाचे विष कालवून लोकांची डोकी भडकवीत होते. प्रचाराची पातळी अत्यंत खाली नेऊन महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकच लावला. मोदी यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहिला हे सांगणे म्हणजे दिशाभूल आहे. मग केरळात वायनाड येथे प्रियंका गांधी चार लाखांच्या मताधिक्याने जिंकल्या, तेथे मोदींची जादू का चालू नये? तेथील मतदारही भाजपचेच नागरिक आहेत ना? बाजूच्या कर्नाटकातील पोटनिवडणुकीत सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या. नांदेड लोकसभेची पोटनिवडणूकही काँग्रेसने जिंकली. तेथे यांची जादू का चालली नाही? मोदी-शहा-फडणवीस यांनी महाराष्ट्रात दुहीची बीजे पेरली, जाती-धर्मात दरी पाडली, मत विभागणीसाठी छोटय़ा पक्षांना सुपाऱ्या देऊन आपले काम साधले. हाच भाजप विजयाचा ‘फॉर्म्युला’ म्हणता येईल. जोडीला प्रचंड पैसा व सरकारी यंत्रणा असल्याने विजयाच्या मार्गावरील खड्डे दूर झाले. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, आडाम मास्तर, कॉ. जिवा पांडू गावीत, वैभव नाईक, राजन साळवी यांच्यासारखे लोकाभिमुख उमेदवार व नेते पडतात आणि अनेक ‘थुकरट’ उमेदवार विजयी केले जातात. हे पिचक्या पाठकण्याचे व स्वाभिमानाची जाण नसलेले लोक मोदी समर्थक म्हणून निवडून आले. ते महाराष्ट्रावरील संकटाशी सामना कसा करतील? महाराष्ट्राची अवस्था ही गुजरातच्या वाटेवरील पायपुसण्यासारखीच झाली आहे व त्यामुळे पैशांच्या बळावर अशी अनेक पायपुसणी निवडून आणली. भारतीय जनता पक्षाला व त्यांच्या मिंध्यांना यात मर्दुमकी वाटत आहे व तसे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. महाराष्ट्रात भाजपने ऐतिहासिक वगैरे कामगिरी केली असे मोदी म्हणतात. महाराष्ट्राची मर्दानगी, स्वाभिमान मारून शिवरायांच्या महाराष्ट्राला थैलीवाल्यांच्या पायाचे दास बनवले, याचा कुणाला आनंद झाला असेल तर त्यांनी खुशाल विजयाच्या जिलब्या खाव्यात, पण महाराष्ट्र आपला लढाऊ बाणा सोडणार नाही. तूर्तास इतकेच!
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)