Published on
:
29 Nov 2024, 1:43 am
Updated on
:
29 Nov 2024, 1:43 am
मुंबई : विधानसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 58.22 टक्के मतदान झाले. त्याच रात्री 11.30 वाजता ते 65.02 टक्के, तर दुसर्या दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबरला हेच मतदान 66.05 टक्के झाल्याचे सांगितले. यात एकूण 7.83 टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. ही वाढ 76 लाख मतांची असून, मतदानाचा टक्का कसा वाढला, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी येथे केला. निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्रांचे व्हिडीओ फुटेज जाहीर करण्याची मागणी पटोले यांनी केली असून, आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकल्याचा आरोप केला.
गेल्या आठवड्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडीसाठी आश्चर्यकारक ठरले आहेत. या निवडणुकीत महविकास आघाडीला 50 आमदारांचा आकडासुद्धा गाठता आला नाही. काँग्रेसने या पराभवाचे खापर मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) फोडले असून, त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे.
काँग्रेसच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांची बैठक झाली. त्यातही वाढीव मतदानाबाबत ईव्हीएमवर उमेदवारांनी शंका उपस्थित केल्या. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढल्याचे प्रमाण पाहता मतदान केंद्रांवर लांबपर्यंत रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदारसंघांत अशा रांगा लागल्या होत्या ते निवडणूक आयोगाने पुराव्यांसह दाखवावे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. त्यामुळे त्याचे चित्रीकरण दाखवावे. मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असतो. यावेळी आयोगाने पत्रकार परिषद का घेतली नाही, असा सवाल पटोले यांनी केला.