केळं हे एक असे फळ आहे जे जवळजवळ सर्वांनाच आवडते. शिवाय केळं हे पोषक तत्वांचा खजिनाही आहे. यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, पोषण आणि फायबर असते जे आपल्या शरीरास अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. मात्र गोड असल्याने केळं मधुमेहींसाठी अवघड बाब ठरते. केळ्यामध्ये असलेल्या साखरेमुळे मधुमेहाच्या रुग्णांनी ते खाऊ नये असे अनेकांचे मत आहे तर काही लोकं त्याचे फायदे सांगून मधुमेहासाठी फायदेशीर मानतात. चला तर मग जाणून घेऊया मधुमेहाचे रुग्ण केळं खाऊ शकतात का आणि तसे असेल तर किती प्रमाणात.
फायबरचा चांगला स्रोत
केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. फायबर अन्न हळूहळू पचविण्यास मदत करते जेणेकरून रक्तातील साखरेमध्ये अचानक चढ-उतार होणार नाहीत.
पोटॅशियमचा चांगला स्रोत
केळं हा पोटॅशियमचा उत्कृष्ट स्त्रोत आहे जो रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या आहे. त्यामुळे मधुमेह्यांच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केळं खाऊ शकतात
जीवनसत्त्वे आणि पौष्टिकतेने समृद्ध
केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम सारखे अनेक आवश्यक पोषक असतात, जे शरीराचे संपूर्ण आरोग्य सुधारण्याचे कार्य करतात.
मधुमेह रुग्णांनी केळीचे सेवन करताना कोणती खबरदारी घ्यावी?
केळ्यामध्ये मध्यम ग्लाइसेमिक इंडेक्स असतो. याचा अर्थ असा आहे की ते रक्तातील साखर वेगाने वाढवू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी ते मर्यादित प्रमाणात खावे.
पिकलेल्या केळ्यामध्ये कच्च्या केळ्यापेक्षा जास्त साखर असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी कच्च्या किंवा हलक्या पिवळ्या केळ्याची निवड करून सेवन करावे.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी दिवसातून एक लहान किंवा मध्यम आकाराचे केळं खाणे सुरक्षित मानले जाते. तथापि, हे त्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी आणि इतर घटकांवर अवलंबून असू शकते.
मधुमेहाचे रुग्णही केळं खाऊ शकतात, पण या काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या आहारात केळी समाविष्ट करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घेणे चांगले. तुमच्यासाठी किती केळी खाणे सुरक्षित आहे आणि तुमच्या आहारात त्याचा समावेश कसा करू शकता हे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)