देवळाली मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आपणच असल्याचा दावा आमदार सरोज अहिरे यांनी केला.file
Published on
:
18 Nov 2024, 6:25 am
Updated on
:
18 Nov 2024, 6:25 am
देवळाली कॅम्प : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या स्वाक्षरीचे पत्र जनता जनार्दनाच्या साक्षीने जाहीर सभेत वाचून दाखविताना मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांचीदेखील संमती असल्याने महायुतीच्या देवळाली मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आपणच असल्याचा दावा आमदार सरोज अहिरे यांनी केला.
देवळाली विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडण्यात आली. त्या ठिकाणी विद्यमान आमदार सरोज अहिरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्यांनी महायुतीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु याच मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने डॉ. राजश्री अहिरराव यांनीही अर्ज दाखल केला. त्यांना शिंदे गटाने एबी फॉर्मदेखील दिला. मात्र पक्ष आदेशानुसार त्या वेळेवर उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकल्या नाहीत. नंतर स्थानिक नेत्यांनी अहिरराव यांचा प्रचार सुरू करत मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नाराजी सुरू झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी (दि. १६) गिरणारे येथे जाहीर सभा पार पडली. त्या सभेत पवार यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज अहिरे असल्याचे स्पष्ट करत शिवसेना पक्षाच्या सचिवांचे पत्र वाचून दाखवले. दि. 8 नोव्हेंबरचे पत्र इतक्या उशिरा का व्हायरल केले? याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार अहिरे यांनी खुलासा करताना सांगितले की, हे पत्र 8 तारखेला आलेले आहे. परंतु याबाबत वरिष्ठ नेते खुलासा करतील, असे आदेश असल्याने आम्ही याबाबत कोणीही कोठेही चर्चा केली नाही. काल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत जाहीर खुलासा केलेला आहे. आम्ही जिल्ह्यामध्ये सर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून एकमेकांना मदत करीत आहोत. कोणत्याही मतदारसंघात किंतु-परंतुचा विषय राहिलेला नाही. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महायुतीच्या उमेदवार आपण असल्याचे स्पष्ट केलेले आहे. देवळाली मतदारसंघात काही लोक मुद्दाम माझ्या विजयाच्या आड येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु जनता सुज्ञ असून, केलेली विकासकामे व महायुतीच्या नेत्यांचा विश्वास या माध्यमातून आपण दुसऱ्यांदा विधानसभा गाठणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.