Published on
:
18 Nov 2024, 8:24 am
Updated on
:
18 Nov 2024, 8:24 am
राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजून आचारसंहिता सुरु झाली की उमेदवारांच्या आधीपासून सरकारी कर्मचार्यांचे हाल सुरु होतात. मतदानकेंद्राची खरी जबाबदारी स्वीकारणारे अनेक शिक्षक व अन्य कर्मचारी हे शिस्तप्रिय व तुलनेत अधिक जबाबदार असल्याने वर्षानुवर्षे शिक्षकांची इलेक्शन ड्युटी फिक्स असते. सरकारची मात्र गरज सरो, वैद्य मरो अशी भूमिका असल्याने कर्मचार्यांचा निवडणूक कामांसाठी नाराजीचा सूर असून निवडणुकीच्या दुसर्या दिवशी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे.
विक्रमगड व शहापुर व भिवंडी ग्रामीण या विधानसभा मतदार क्षेत्रातील अनेक कर्मचार्यांना वसई, विरार, नालासोपारा ,डहाणू अशा ठिकाणी निवडणुकीचे काम बजावण्यासाठी जावे लागते तर त्या भागातील कर्मचार्यांना जव्हार ,मोखाडा व विक्रमगड या भागात यावे लागते. विक्रमगड विधानसभा क्षेत्रात 358 मतदानकेंद्र असून यात जवळ्पास 1 हजार 800 कर्मचारी सहभागी आहेत.भिवंडी ग्रामीणमध्ये जवळ्पास 341 मतदान केंद्र असून प्रत्येक केंद्रांवर 5 ते 6 कर्मचारी संख्या आहे. निवडणुकीच्या आधी प्रशिक्षण, निवडणुकीच्या आदल्या दिवशीपासुन कामाला सुरुवात, आपल्या सोबत कोण सहकर्मचारी आहेत याची माहिती करून निवडणूक साहित्य ताब्यात घेणे, मतदान केंद्रांचा ताबा घेउन साहित्याची जुळवाजुळव करणे अशा कामांचा कर्मचार्यांना नकळत ताण सहन करावा लागतो. महिला कर्मचारी केंद्राच्या जवळ असेल तर अधिकार्यांच्या परवानगीने घरी जाण्याची मुभा असते मात्र मतदानाच्या दिवशी पहाटे पाच वाजता मतदान केंद्रावर हजर राहावेच लागते. शक्यतो महिला कर्मचार्यांना मतदान केंद्रांवरचं थांबल्या शिवाय पर्याय नसतो त्यात गाव राजकरणात सुपीक असला तर सोय चांगली होते अन्यथा असेल त्या परिस्थितीत कर्मचार्याला समायोजन करावे लागते. अनेकदा पिण्याचे स्वच्छ पाणी व जेवणाची व्यवस्था देखील स्वखर्चाने करावी लागत असुन अनेकांना उपाशीपोटी काम करावे लागल्याचे कटू अनुभव आहेत. मतदान केंद्रावर तशा सर्व सोयी पूर्वनियोजित असतात मात्र विशेषतः महिला कर्मचार्यांना गावातच आपली व्यवस्था करून घ्यावी लागते.