महायुतीमधील वाद चव्हाट्यावर:भोसरी-चिंचवड मतदारसंघावरून तेढ निर्माण, अजित पवार गटाचा ठराव मंजूर

2 hours ago 2
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपावर एकमत नसल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पक्षानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने देखील वेगळा ठराव मंजूर केला आहे. भाजपने पिंपरी-चिंचवड विधानसभेवर दावा केला आहे. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने भाजपच्या वाट्याला असणाऱ्या भोसरी-चिंचवड जागा राष्ट्रवादीसाठी घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. भाजप राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसेल तर आम्ही भोसरी आणि चिंचवडमध्ये प्रचार न करण्याचा निर्णय घेऊ शकतो, असा इशारा अजित पवार गटाने दिला आहे. या बैठकीत अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे उपस्थित होते. तसेच भाजपने बनसोडे यांचा विरोध केला असल्याने बनसोडे समर्थक देखील आता आक्रमक झाले असल्याचे दिसत आहे. काय म्हणाले अण्णा बनसोडे? आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, ज्या पक्षांचे ज्या ठिकाणी आमदार असणार आहेत, ती जागा त्या पक्षाच्या आमदारासाठी सोडण्यात येणार आहे. असा निर्णय महायुतीमधील सर्व पक्षांनी घेतला आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आहे. विद्यमान आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आहे. त्यामुळे ही जागा देखील राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे. काही लोकांना हा मतदारसंघ आपल्याला मिळावा असे वाटत आहे. शेवटी युती धर्म म्हणून वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल त्यासाठी आम्ही बांधील आहोत, असे बनसोडे म्हणाले. भाजपचा अण्णा बनसोडे यांना विरोध पिंपरी विधानसभेत अजित पवार गटाचा प्रचार करायचा नाही, असा ठराव भाजपने केला आहे. त्यामुळे भाजपने थेट आमदार अण्णा बनसोडे यांना विरोध दर्शवला आहे. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीचा प्रचार केला नाही मग आपण घडाळ्याचा प्रचार का करायचा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या सर्व घटना पाहता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागांवरून एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे. याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र अखेर महायुतीमधील वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल असेही एकीकडे बोलले जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article