मोठय़ा प्रमाणात विरोधात मतदान होऊनही महायुतीचे उमेदवार निवडून आलेच कसे, असा प्रश्न बहुतांश मतदारसंघांमधील मतदारांना पडला आहे. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात घडलेल्या दुर्घटनेला सर्वस्वी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच महायुतीचा विजय हा आधीच ठरला होता, फक्त मतदान करून घेतले गेले, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची लढाई बरोबरीत सुरू होती; पण नंतर पुढच्या दोन तासांत सगळे चित्र बदलले. चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश असताना जर वेळेवर आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला असता तर या गोष्टी घडल्याच नसत्या, असा दावा करतानाच, निकाल देणार नसाल तर मग त्या खुर्च्यांवर का बसला होता, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
चंद्रचुडांना इतिहास माफ करणार नाही
चंद्रचूड हे उत्तम प्रोफेसर किंवा बाहेर भाषणे द्यायला चांगले आहेत; मात्र सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पद्धतीने निर्णय दिला नाही. चंद्रचूड यांचे नाव इतिहासात काळय़ाकुट्ट अक्षरात लिहिले जाईल. इतिहास त्यांना माफ करणार नाही. त्यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय न दिल्याने पक्षांतराच्या खिडक्या ते उघडय़ा ठेवून गेले आहेत. आताही कुणीही कुठेही कशाही उडय़ा मारू शकेल, आमदार विकत घेऊ शकेल. कारण घटनेच्या दहाव्या सूचीची भीतीच राहिली नाही, असे स्पष्ट मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले.
महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार ते गुजरात लॉबी ठरवेल. महाराष्ट्राऐवजी गुजरातला शपथविधी सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल, असे संजय राऊत म्हणाले. शिवतीर्थावर महायुतीचा शपथविधी सोहळा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल आणि वानखेडे स्टेडियमवर झाला तर तो महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान होईल, असेही ते म्हणाले.
मतविभागणी हा सर्वात मोठा फॅक्टर
विधानसभा निवडणुकीत मतविभागणी हा सर्वात मोठा फॅक्टर ठरला याकडेही संजय राऊत यांनी लक्ष वेधले. मनसे, वंचित यांना मॅनेज करून ठिकठिकाणी कमी कमी मतांनी पाडण्यात आले असे चित्र मुंबईसह सगळीकडे दिसले. संघाची भूमिकाही या निवडणुकीत महत्त्वाची राहिली आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी विषारी प्रचार केला. त्याचा आम्हाला फटका बसला, असे संजय राऊत म्हणाले. शरद पवार यांना मानणारा वर्ग आहे तिथे त्यांचे उमेदवार पडले असतील तर तो गंभीर विषय आहे, असेही ते म्हणाले.