केंद्रीय रस्ते महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरीpudhari
Published on
:
17 Nov 2024, 6:26 am
Updated on
:
17 Nov 2024, 6:26 am
विधानसभेची ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असून, महाराष्ट्रातील जनतेचे भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे. चुकीचे आर्थिक धोरण आणि भ्रष्टाचारी राजवट, यामुळे काँग्रेसच्या काळात महाराष्ट्र आणि देशात कामे झाली नाहीत. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले, तर राज्याच्या विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट वेगाने धावेल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
कोथरूडचे भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ कोथरूडमधील राहुलनगर येथे आयोजित सभेत गडकरी बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, राजेश पांडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्यातील प्रदूषण होईल कमी
पुण्यातील प्रदूषण खूप वाढले आहे. हे प्रदूषण कमी झाले पाहिजे. पुणे अतिशय सुंदर आहे. आम्ही जे प्रकल्प हाती घेतले आहेत, ते पूर्ण झाल्यानंतर शहराचे प्रदूषण नक्कीच कमी होईल, असेही गडकरी म्हणाले.
गडकरी म्हणाले, आज पुराच्या पाण्यामुळे दरवर्षी देशात तीन-साडेतीन लाख कोटींचे नुकसान होते. देशात पाण्याची कमतरता नाही. मात्र, पावसाच्या पाण्याचे नियोजन केले गेले नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही नदीजोड प्रकल्प हाती घेतला, समुद्रात जाणारे पाणी वापरात आले. काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला; पण गरिबी हटली नाही. आम्ही नवीन धोरणे आखली, त्यामुळे आर्थिक बाबीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. पुढील पाच वर्षांत आपण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये चीनला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर जाऊ. योग्य नीती, योग्य नेतृत्व आणि योग्य पक्ष निवडला तर विकास होतो.
देशाच्या विकासासाठी पैशाची कमी नाही, कमी आहे ती इमानदारीने काम करणाऱ्या नेत्यांची. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही संविधान बदलणार, असा खोटा प्रचार केला. पण, संविधान कोणीही बदलणार नाही आणि कोणाला बदलूही देणार नाही. स्वतःच्या
स्वार्थासाठी काँग्रेसने संविधानाचे स्पिरिट बदलले. ज्यांनी संविधान तोडण्याचे पाप केले, ते आज संविधान हातात घेऊन राजकारण करत आहेत. देशात सामाजिक व आर्थिक समानता प्रस्थापित करायची आहे. समाजातील मतभेद दूर करणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, नम्रपणा हे हिंदू संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. कोथरूडकडे मी कधीही दुर्लक्ष केले नाही. व्यक्ती, विकास आणि पायाभूत सेवासुविधांवर मी भविष्यात काम करणार आहे. राज्याचा गतिमान विकास होण्यासाठी महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे.