महिला पोलिसाच्या अंत्यसंस्काराहून परतताना पोलिसाचा अपघाती मृत्यू झाला.
Published on
:
06 Feb 2025, 2:04 am
Updated on
:
06 Feb 2025, 2:04 am
तासगाव : तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रातील महिला पोलिस प्रितंका पोटे यांचा मंगळवारी सकाळी बलवडी फाटा येथे कारच्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी गेलेले संकेत सुरेश पाटील (वय 30, रा. नागाव, निमणी) या पोलिसाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात पाचवा मैल तुरची कारखाना फाटा येथे मंगळवारी रात्री झाला. एकाच दिवसात तुरची प्रशिक्षण केंद्रातील महिला पोलिस व पोलिस कॉन्स्टेबल यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
देवराष्ट्रे येथील प्रितंका पोटे या महिला पोलिस मंगळवारी तुरची प्रशिक्षण केंद्रात कामावर उपस्थित राहण्यासाठी जात होत्या. त्यावेळी सकाळी बलवडी फाटा येथे त्यांच्या दुचाकीला मोटारीने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. प्रितंका यांच्या पार्थिवावर देवराष्ट्रे येथे मंगळवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला हजर राहून संकेत पाटील दुचाकीवरून नागावला परत येत होते. रात्री त्यांची दुचाकी पाचवा मैल ते तुरची फाटादरम्यान आली असता, दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ते रस्त्यावर जोरात आपटले. त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने रक्तस्राव झाला. त्यांना तातडीने तासगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संकेत यांच्यामागे आई, भाऊ, पत्नी व लहान मुलगा असा परिवार आहे.