Published on
:
27 Nov 2024, 6:11 am
Updated on
:
27 Nov 2024, 6:11 am
कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीनिमित्त येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिरामध्ये मंगळवारी (दि. 26) हजारो भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले. या वेळी शेकडो दिंड्यांनी येथे ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत हजेरी लावली होती. माऊलींच्या जयघोषाने नेवासानगरी दुमदुमली होती.
एकादशीनिमित्त पहाटेच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख देविदास महाराज म्हस्के यांच्या उपस्थितीत मंदिर विश्वस्त कृष्णा पिसोटे व गुंफाताई पिसोटे यांच्या हस्ते माऊलींच्या पैस खांबास अभिषेक घालण्यात आला. या वेळी विश्वस्त ज्ञानेश्वर शिंदे, कैलास जाधव, रामभाऊ जगताप, भिकाजी जंगले, भैय्या कावरे, शिवाजी अप्पा होन, गोरख भराट आदी उपस्थित होते.
एकादशीनिमित्त मंदिर प्रांगणाबाहेर यात्रा भरली होती. भाविकांच्या दर्शनासाठी मुख्य दर्शन बारीसह मंदिर प्रवेशद्वारापासून मुखदर्शनासाठी बारी तयार करण्यात आली होती. या वेळी खेड्यापाड्यांतून पायी आलेल्या व दिंडीतील चालकांचा श्रीफळ देऊन विश्वस्त मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
म्हस्के महाराज म्हणाले की, माऊलींच्या कर्मभूमीमध्ये गेल्या चार महिन्यांपासून आळंदीच्या धर्तीवर ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीवर दररोज प्रवचन निरूपण सुरू केले असून, दररोज पहाटे भक्तांच्या हस्ते पैस खांबास अभिषेक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमासाठी नावनोंदणी करून सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.