>> आशा कबरे-मटाले
काहींचा विशिष्ट विचारसरणीबाबतचा कडवेपणा वाढत चालला आहे. यात अल्पशिक्षितांपासून उच्चशिक्षितांपर्यंत कुणीही असू शकतं. आपली विचारसरणी समोरच्या व्यक्तीला मान्य नसल्यास त्या व्यक्तीला पूर्णपणे नाकारलं जातं. प्रौढांमध्ये दिसणारा हा दुराग्रह आता तरुणाईतही झिरपू लागला आहे का?
लेख प्रकाशित होईल तेव्हा आदल्याच दिवशी (शनिवारी) विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले असतील. राज्यातील जनतेचा कौल नेमक्या कुठल्या बाजूला आहे हे कळेल. हा कौल सुस्पष्ट असल्यास सरकार स्थापनेच्या हालचाली सहजपणे सुरू होतील, पण तो कुठल्याही एका बाजूच्या दिशेने स्पष्टपणे नसल्यास आणखी राजकीय समीकरणं जुळवून बहुमताचा आकडा गाठण्याच्या हालचाली वेग घेतील. निकालानंतर नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा जिंकणाऱ्या बाजूचा विजयोत्सव व पराभूतांना खिजवणं हे चित्रही दिसेल. अलीकडच्या काही वर्षांत समाज माध्यमांचा सुळसुळाट झाल्यापासून निकालानंतर विजयी बाजूच्या संदेश आणि विडंबनात्मक मीम्सचा पूर येतो, परंतु यातही सर्वसामान्यांमध्ये एका विशिष्ट बाजूचे लोकच बहुतेक सर्व समाज माध्यमांवर अधिक बोलत असल्याचं, अधिक आक्रमक पोस्टी आणि संदेश टाकत असल्याचं दिसून येतं, तर दुसऱ्या बाजूला बहुसंख्य सामान्य जनांची चिडीचूप शांतता दिसते.
एका विशिष्ट पक्षाच्या समर्थकांनी आपल्या सर्वोच्च नेत्याचा वारेमाप उदो उदो करायचा, काही वेळा अल्पसंख्य समाजाबद्दल बेधडक वाटेल ती विधानं करायची, आपल्या पक्षाला पाठिंबा देणारे तेवढे राष्ट्रभक्त व बाकीचे जणु काही राष्ट्रद्रोही असा टोकाचा सूर लावायचा हे सारं गेली काही वर्षं नित्याचं झालं आहे. यात कैकदा किमान सभ्यतेच्या मर्यादाही ओलांडल्या जात असल्या तरी बहुतेक ठिकाणी फारसं कुणी या उन्मादी प्रवृत्तीच्या विरोधात काही बोलायचं नाही, निमूट सारं सहन करायचं असं वातावरण असंख्य संस्था-समूहांच्या व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर दिसतं. कुणी बोललंच तर ही ‘बोलकी’ मंडळी त्या एकट्यादुकट्या व्यक्तीला घोळक्याने घेरून बेजार करतात. दुसरीकडे कौटुंबिक व नातेवाईकांच्या ग्रुप्सवर सर्वसाधारणपणे राजकीय पोस्टी टाळण्याचेच संकेत पाळले जातात. जी काही राजकीय मतमतांतरं असतील ती प्रत्यक्ष उपस्थितीत व्यक्त करायची, प्रसंगी वादही घालायचे, पण व्हाट्सअॅप ग्रुपवर वा कुठल्याही समाज माध्यमावर त्यासंदर्भात व्यक्त व्हायचं नाही असा शिरस्ता बहुतेक जण पाळतात. जणुकाही राजकीय विचारांची अभिव्यक्ती ही एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकरिताच राखीव असावी आणि तेही त्यास राजकीय विचार न म्हणता चक्क देशाविषयीचा अभिमान असं संबोधतात. यात असतं काय, तर त्या एकाच नेत्याच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कामगिरीचा उदो उदो करायचा, देशातील आधी होऊन गेलेल्या तमाम नेतृत्वांना क्षुद्र लेखायचं, त्यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढायचे हेच सारं अधूनमधून घडताना दिसतं. कुठल्याही निवडणूक निकालानंतर काही दिवस हे असले प्रकार व पोस्टी अधिक बोकाळतात आणि त्यातून होणाऱ्या चिडचिडीतून, वादांतून कित्येकांच्या सामाजिक-व्यावसायिक संबंधांमध्ये कटुता निर्माण होते. एखाद्या राजकारणबाह्य क्षेत्रात कार्यरत व्यक्तीची राजकीय भूमिका म्हणजे काही ती संपूर्ण व्यक्ती नव्हे, परंतु गेल्या काही वर्षांत यासंदर्भातील प्रगल्भता कमी होऊ लागली आहे असा प्रत्यय येतो.
महाराष्ट्रात येऊ घातलेले काही उद्योग गुजरातने पळवले, अनेक वित्तीय संस्था मुंबईतून गुजरातला जात आहेत, महाराष्ट्रातली काही नेते मंडळी दिल्लीश्वरांसमोर नको इतके पुढे पुढे करतात, साऱया उद्योगक्षेत्रामध्ये एक वा दोन विशिष्ट उद्योजकांचीच मत्तेदारी दिसते, परंतु यासंदर्भात समाज माध्यमांवर मतप्रदर्शन केल्यास मूळची ‘त्या’ राज्यातली असणारी, परंतु गेली अनेक वर्षं महाराष्ट्रात वास्तव्यास असलेली मंडळी रुष्ट होतात. तुम्ही जणुकाही त्यांचे वैयक्तिक विरोधक असल्यासारखी ती तुम्हाला वागवू लागतात. विशिष्ट विचारसरणीची बहुतेक मंडळी अशीच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात. (अर्थात काही प्रगल्भ व्यक्तींचा अपवाद वगळता.) कुणाचाही विरोध असतो तो महाराष्ट्रविरोधी निर्णयांना असतो. सगळे उद्योग एकाच कुणाच्या घशात घालण्याला, मत्तेदारी निर्माण करण्याला असतो, परंतु यापैकी काहीही त्या विशिष्ट विचारसरणीच्या समर्थकांना खटकत नसते. त्यांना कशाबद्दलही शंका येत नाही. सारं कसं देशाला सुपरपॉवर बनवण्याच्या दिशेनेच चाललं आहे असं एकीकडे म्हणणारी ही मंडळी आपल्या पुढच्या पिढीला मात्र अमेरिकेचे नागरिक बनविण्याचा एकच ध्यास घेऊन जगताना दिसतात.
या साऱ्या वातावरणाचा त्या पुढच्या तरुण पिढीवरही परिणाम नक्कीच होत असावा. अलीकडेच एका सर्वेक्षणात तरुण पिढी आता ‘डेटिंग साइट’वर आपला राजकीय कल ठळकपणे नोंदवू लागली आहे असं निरीक्षण नोंदविण्यात आलं. विशेषतः यंदाच्या विधानसभा निवडणुकांच्या काळात हा बदल ठळकपणे समोर आला. यापूर्वी निव्वळ छंद, आवडीनिवडी, व्यक्तिमत्त्वात काय महत्त्वाचं वाटतं, करीअरविषयीच्या महत्त्वाकांक्षा आदींचे उल्लेख करणारी तरुण पिढी आता डेटिंग साइटवर उजवी की डावी विचारसरणी, लिबरल वा कोणतीही विचारसरणी नाही, असा स्पष्ट उल्लेख करू लागली आहे. हा बदल कशातून हे स्पष्ट करताना बहुतेकांनी राजकीय विचारसरणीतून त्या-त्या व्यक्तीच्या मूलभूत जीवनमूल्यांची, व्यापक दृष्टिकोनाची, जीवनशैलीची आपसूकच ओळख होते, असं सांगितलं. स्त्राrवाद, आरक्षण, होमोसेक्शु-अॅलिटी यासंदर्भातली मतं काही तरुण-तरुणींना महत्त्वाची वाटतात व राजकीय विचारसरणीचा त्यावर आपोआप परिणाम होतो असा त्यांचा सर्वसाधारण अनुभव आहे. राजकीय विचारसरणी म्हणजे निव्वळ तेवढीच मतं नव्हेत, तर त्यातून तुम्ही कसे वाढला आहात, जगाकडे कसं पाहता हेही कळतं.
एकंदर, एकीकडे प्रौढ पालक मंडळी आपल्या राजकीय विचारसरणीबाबत मौन पाळणं पसंत करत असताना तरुणांना मात्र मैत्रीसंबंध जोडताना समोरच्याची राजकीय विचारसरणी तपासून पाहणं महत्त्वाचं वाटू लागलं आहे. कोण किती धार्मिक आहे, सांस्कृतिक गोष्टींना महत्त्व देणारं आहे हेही यातून स्पष्ट होतं, असं काहींना वाटतं. एखाद्याशी खरोखरच बंध जुळू शकतील का हे त्याच्या-तिच्या राजकीय विचारसरणीतून उघड होतं असं काही तरुण-तरुणी म्हणतात. जुन्या पिढीत पती-पत्नी सहजपणे दोन वेगवेगळ्या पक्षांचे समर्थक असत. त्यावरून एकमेकांना मिश्कीलपणे चिडवणं व आपापलं मतदान करून मोकळं होणं इतका सहजपणा असे. आता काही लोक आपल्या विचारसरणीबाबत फारच कडवे होत चालले आहेत. त्यामुळे समाजात विविध स्वरूपात त्याची प्रतिक्रिया उमटणंही स्वाभाविकच आहे.