माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला:अज्ञात 4 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न कलमाखाली गुन्हा दाखल
2 days ago
1
राष्ट्रवादी शपचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात अज्ञात चार युवकांविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी एक चित्रफित जारी करून दिली आहे. माहिती मिळताच घटनास्थळाला जिल्हाधिकारी तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सुद्धा भेट दिली आहे. आरोपीच्या शोधासाठी चार पथके तैनात केली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कुणीही बिघडण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केल्या जाईल असा इशारा पोद्दार यांनी दिला आहे. भाजपाला वारंवार आव्हान देणारे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्या गाडीवर काही अज्ञात युवकांनी सोमवार १८ रोजी रात्री दगडफेक केली. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना काटोल येथील ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्या नंतर त्यांना नागपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी दगडफेक केली. या घटनेत देशमुख गंभीर जखमी झाले. नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ दुचाकी वरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या कारच्या काचांना तडा गेला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी पराभव समोर दिसत असल्याने अनिल देशमुख यांनी केलेला हा निवडणूक स्टंट असल्याची टिका काटोल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी व भाजपा नेते अविनाश ठाकरे व भाजपा आमदार परिणय फुके यांनी यांनी केली आहे. तर सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादातूनच देशमुखांवर हल्ला झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. काटोल मतदारसंघातील भाजप उमेदवार चरणसिंह ठाकूर यांना सत्ताधारी भाजपचा वरदहस्त आहे. अनेक गुन्हेगारांना त्यांनी आश्रय दिला आहे असा आरोप सलील देशमुख यांनी केला. तर राष्ट्रवादी श. प. चे नेते प्रवीण कुंटे पाटील यांनी स्टंटबाज परिणय फुके यांनी नाना पटोले यांच्या विराेधातही स्टंटबाजी केली होती. तरीही ते पराभूत झाले होते असे सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)