Published on
:
16 Nov 2024, 8:53 am
Updated on
:
16 Nov 2024, 8:53 am
मोहोळ : रमेश दास
भीमा नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा मासे पकडण्याच्या जाळीत पाय अडकून पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता.१४) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अर्धनारी (ता.मोहोळ) खोरी परिसरात घडली.
सीताराम रामचंद्र भोई (वय : ४५, रा.बेगमपूर, ता. मोहोळ) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा,विवाहित दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. या घटनेची नोंद कामती पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बेगमपूर (घोडेश्वर) येथील सिताराम भोई व त्यांचे कुटुंबिय भीमा नदीच्या पात्रात मासेमारी करून आपली उपजीविका भागवितात. गावातील भोई समाजातील बहुतांश मच्छीमार व्यावसायिक मासेमारीसाठी गावापासून काही अंतरावर असलेल्या अर्धनारी (खोरी परिसर), नळी येथे जातात. नेहमीप्रमाणे सीताराम व अन्य काहीजण गुरुवारी (ता.१४) सकाळी अर्धनारी भागातच मच्छीमारीसाठी गेले होते. यावेळी मासे पकडत असताना मासे पकडण्यासाठी आणलेल्या नॉयलॉनच्या जाळीत सीताराम याचा पाय अडकला व तो पाण्यात पडला. त्यातून सुटका करण्यासाठी त्याने प्रयत्न केला. परंतु नदीपात्रात खोल पाणी असल्याने तो त्यात बुडाला. यावेळी सोबतच्या सहकाऱ्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना भ्रमणध्वनी वरून बेगमपूर येथील भोई समाजाच्या युवकांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गावातील सुमारे पन्नासहून अधिक युवक घटनास्थळी धावले.
यापैकी काहींनी तात्काळ नदी पात्रात पाण्यात उड्या घेत सितारामचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु तो लवकर हाती लागला नाही. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर पाण्यात खोलवर त्याचा मृतदेह आढळुन आला. युवकांनी सदरचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. कामती पोलिसांना याची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताचा भाऊ चंद्रकांत भोई यांनी कामती पोलिस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली. पोलिसांनी रितसर पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सायंकाळी उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.