50th day solemnisation of wankhede stadium : सचिन तेंडुलकर याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील शेवटचा सामना हा वानखेडे स्टेडियममध्ये खेळला होता. सचिनने या सामन्यामागचा माहित नसलेला किस्सा वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सांगितला.
Sachin Tendulkar 50th day solemnisation of wankhede stadium
टीम इंडियाचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात अनेक आठवणींना उजाळा दिला. एमसीएकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सचिनने त्याच्या वानखेडे स्टेडियममधील आठवणींचा पाढा वाचून दाखवला. सचिनने क्रिकेटचे धडे याच स्टेडियममध्ये गिरवले. तर याच स्टेडियममधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरचा सामना हा याच ऐतिहासिक स्टेडियममध्ये खेळला. सचिनला 200 व्या कसोटी आणि अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यानिमित्ताने खास निरोप देण्यात आला. सचिनचा निरोप सामना हा अविस्मरणीय व्हावा, यासाठी बीसीसीआयने वानखेडे स्टेडियमध्ये खास आयोजन केलं. मात्र सचिनला त्याचा शेवटचा सामना स्वत:साठी नाही तर आईसाठी खेळायचा होता. यामागची इनसाईड स्टोरी स्वत: सचिननेच सांगितलीय.
सचिन काय म्हणाला?
“माझ्या कारकीर्दीतील शेवटची कसोटी मालिका जाहीर होण्याआधी मी बीसीसीआय अध्यक्षांच्या संपर्कात होतो. माझा शेवटचा सामना हा एका कारणामुळे वानखेडे स्टेडियममध्ये व्हावा, ही इच्छा मी बीसीसीआय अध्यक्षांकडे बोलून दाखवली. मी टीम इंडियासाठी 24 आणि त्याआधी 6 अशी एकूण जवळपास 30 वर्ष खेळलो. मात्र माझ्या आईने मला 30 वर्ष कधी खेळताना पाहिलं नाही. तसेच त्यावेळेस माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे आईसाठी वानखेडे व्यतिरिक्त इतर दुसरं कोणतही स्टेडियम सोयीस्कर ठरलं नसतं.त्यामुळे आईने इथं यावं आणि मी 24 वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी का जात आहे? हे तिने इथे बसून पाहावं. यासाठी मालिकेतील सामना मुंबईत खेळवावा अशी मी माझी शेवटची इच्छा बीसीसीआयकडे बोलून दाखवली आणि त्यांनी ती पूर्ण केली”, असं सचिनने या खास कार्यक्रमात म्हटलं.