मेळघाटच्या १९० मतदान केंद्रांवर पोलिंग पार्टी रवाना:एकूण ३५६ मतदान केंद्रांचा समावेश
2 days ago
1
अमरावती जिल्ह्याच्या आठही मतदारसंघातील मतदान साहित्याचे वितरण मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी होणार असले तरी मेळघाटच्या १९० केंद्रांचे साहित्य मात्र ४८ तास आधी अर्थात सोमवारीच वितरित करण्यात आले. धारणीच्या एसडीओ कार्यालयात सकाळी १० वाजता साहित्य वितरणाचा प्रारंभ झाला. त्यानंतर मतदान केंद्रनिहाय अधिकारी, कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या वाहनातून या साहित्यासह रवाना झाले. मेळघाट विधानसभा मतदारसंघात एकूण ३५६ मतदान केंद्रांचा समावेश आहे. भौगोलिक रचनेच्या दृष्टीने हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. तालुका मुख्यालय असलेल्या धारणीपासून काही गावे बरीच लांब आहेत. त्यामुळे वेळेवर धावपळ होऊ नये, यासाठी १९० मतदान केंद्राच्या अध्यक्षांना ४८ तास आधीच साहित्य पुरवण्याचा निर्णय निवडणूक यंत्रणेने घेतला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यापूर्वी घेतलेल्या आढाव्यादरम्यान साहित्य वितरणाची आखणी केली होती. त्यात मेळघाटच्या १९० गावांतील मतदान केंद्रांवर ४८ तासांआधीच मतदानाचे साहित्य पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. धारणीच्या एसडीओ कार्यालयातून हे साहित्य वितरित केले. यामध्ये सीयू, बीयू आणि व्हीव्हीपॅट मिळून बनणारी ईव्हीएम, नमूना बॅलेट पेपर्स, मतदान केंद्राबाहेर लावायची सूचना फलके, साहित्य ठेवण्यासाठी लागणारे बॉक्स, शाईचे पेन, सिलींग मटेरियल आणि इतर साहित्याचा समावेश आहे. मतदान केंद्रावरील साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनाची पूजा करताना संबंधित मतदान केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी. उमेदवारांची संख्या अशी बडनेरा मतदारसंघात २६, धामणगाव रेल्वेत २४, अमरावती व अचलपूर येथे प्रत्येकी २२, मोर्शीत १९, दर्यापूर व तिवसा येथे प्रत्येकी १६, तर मेळघाट विधानसभा मतदारसंघात १५ उमेदवार मैदानात आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)