चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडियाची कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली असली तरी जसप्रीत बुमराहच्या दुखापतीने चिंता वाढवली आहे. कारण तो स्पर्धेसाठी उपलब्ध असेल की नाही याबाबत साशंकता आहे. याबाबत उपस्थित पत्रकारांनी अजित आगरकर यांना प्रश्न विचारला तेव्हा त्याने त्याबाबत आता सांगणं कठीण असल्याचं म्हंटलं आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. दुसरीकडे, या संघात यशस्वी जयस्वालची निवड केली आहे. यशस्वी जयस्वालने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दित एकही वनडे सामना खेळला नाही. अशा स्थितीत त्याला संघात घेण्याचं कारण काय? असा प्रश्न कर्णधार रोहित शर्मा याला विचारण्यात आला. तेव्हा रोहित शर्माने याबाबत स्पष्ट मत मांडलं.
‘आम्ही यशस्वी जयस्वालला संघात घेण्याचं कारण की, त्याने पाठच्या सहा-आठ महिन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्याने एकही वनडे सामना खेळला नाही. पण त्याच्यातली क्षमता पाहून त्याची संघात निवड केली आहे.’, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं. टी20 वर्ल्डकप संघातही यशस्वी जयस्वालची निवड करण्यात आली होती. पण संपूर्ण स्पर्धा त्याने बेंचवर बसूनच पाहिली. त्यामुळे आताही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल की नाही याबाबत शंकाच आहे. यशस्वी जयस्वालने 19 कसोटीत 4 शतकं ठोकली आहेत. त्यात दोन द्विशतकांचा समावेश आहे. तर टी20 क्रिकेटमध्ये 23 सामन्यात 1 शतक आणि पाच अर्धशतकांच्या जोरावर 723 धावा केल्या आहेत.
दरम्यान, रोहित शर्मा रणजी स्पर्धेत खेळणार असून त्यासाठी सराव करत आहे. याबाबत रोहित शर्माला पत्रकारांनी विचारलं की, आता रणजी खेळणार आहेत आणि अचानक व्हाईट बॉल क्रिकेटला सामोरं जाणार, तर तुझं काय म्हणणं आहे. यावर रोहित शर्मा म्हणाला की, ‘मी माझ्या करिअरमध्ये क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये खेळलो आहे. मला हे अंगवळणी पडलं आहे. मला चांगल्या प्रकारे रेड बॉलवरून व्हाईट बॉलवर स्विच करता येतं.’