राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. येत्या २३ जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेतील एका बड्या नेत्यानं केलं आहे. काँग्रेसचे आणि ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचेही शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. ’23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत’, असे राहुल शेवाळे यांनी म्हटलंय तर काँग्रेसचे काही आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे काही आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहेत. दहा ते पंधरा आमदार शिवसेनेत प्रवेश करू शकतात, आणि त्यामुळे कुठे न कुठे तरी आपला पक्ष फुटू शकतो, अशी भीती आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या उदयापेक्षा स्वत:च्या पक्षाच्या अस्ताची चिंता करा, असा खोचक सल्ला वजा टोला राहुल शेवाळे यांनी लगावला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी पूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडणार होती. उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळे होणार होते. त्यांच्या सोबत 20 आमदारही होते, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला. तर महायुतीचं सरकार आलं तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आडून बसले होते, त्यामुळे उदय सामंत यांना घेऊन सरकार बनवण्याचा भाजपचा प्लान होता, असंही संजय राऊत यांनी म्हटलं. यासोबत उद्धव ठाकरेंना संपवलं आता एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवीन ‘उदय’ पुढे येईल, असं खळबळजनक वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.