रणजी ट्रॉफी स्पर्धेत मागच्या काही सामन्यात मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. मुंबई आणि बडोदा हे देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज संघ आहेत. या दोन्ही संघांना जम्मू काश्मीर संघाने पराभवाचं पाणी पाजलं आहे. तसेच उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा पक्की केली आहे. पहिल्यांदा मुंबईला पराभूत केल्याने स्पर्धेत जर तरची स्थिती निर्माण झाली होती. दुबळ्या जम्मू काश्मीर संघाने अजिंक्य रहाणेच्या संघाला पराभवाची धूळ चारली होती. या संघात रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर सारखे दिग्गज खेळाडू होते. पण असं असूनही पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे मुंबईला पुढच्या फेरीत स्थान पक्कं करायचं तर जम्मू काश्मीर आणि बडोदा सामन्यावर अवलंबून होतं. मुंबईचं उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट जम्मू काश्मीरच्या विजयावर अवलंबून होतं. तर बडोद्याला पुढच्या फेरीत प्रवेश करायचा तर हा सामना जिंकणं भाग होतं. पण जम्मू काश्मीरने बडोद्याला पराभूत केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत मुंबईसह एन्ट्री मारली आहे. ग्रुप ए च्या गुणतालिकेत जम्मू काश्मीर 35 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर 29 गुणांसह मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे.
नाणेफेकीचा कौल जम्मू काश्मीरने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात जम्मू काश्मीरने 246 धावा केल्या. प्रत्युत्तरात बडोद्याचा संघ 166 धावांवरच गारद झाला. त्यामुळे पहिल्या डावात 80 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात जम्मू काश्मीरने 284 धावा केल्या आणि 364 धावा केल्या. बडोद्यापुढे विजयासाठी 365 धावांचं आव्हान होतं. हे आव्हान गाठताना बडोद्याचा संघ अवघ्या 182 धावांवरच गारद झाला. या सामन्यात जम्मू काश्मीरने 182 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात कन्हैया वधावनला सामनावीराच्या पुरस्कारने गौरविण्यात आलं.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
बडोदा (प्लेइंग इलेव्हन): शिवालिक शर्मा, शाश्वत रावत, विष्णू सोळंकी, मितेश पटेल (विकेटकीपर), कृणाल पांड्या (कर्णधार), अतित शेठ, महेश पिठिया, भार्गव भट्ट, नित्या पंड्या, निनाद अश्विनकुमार रथवा, आकाश महाराज सिंग.
जम्मू आणि काश्मीर (प्लेइंग इलेव्हन): शुभम खजुरिया, विव्रत शर्मा, यावर हसन, पारस डोगरा (कर्णधार), कन्हैया वाधवान (विकेटकीपर), आबिद मुश्ताक, औकिब नबी दार, लोन नासिर मुझफ्फर, साहिल लोत्रा, सुनील कुमार, उमर नजीर मीर.