रत्नजडित मुकुट, बक्षीस रकमेशिवाय मिस युनिव्हर्सला आणखी काय मिळते?Pudhari File Photo
Published on
:
17 Nov 2024, 11:51 pm
Updated on
:
17 Nov 2024, 11:51 pm
न्यूयॉर्क : मिस युनिव्हर्स हा सौंदर्यस्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठित किताब मानला जातो. हा किताब जिंकणार्या स्पर्धकाला फक्त रत्नजडित मुकुट आणि बक्षिसाची रक्कमच नाही तर इतरही बर्याच सुविधा दिल्या जातात. मिस युनिव्हर्स जिंकणार्या स्पर्धकाला या सुविधा वर्षभर मिळतात. या सुविधा मिस युनिव्हर्स विजेतीच्या लौकिकाला साजेशा अशाच असतात. व्हिक्टोरिया कजेर थेलविग यंदाची मिस युनिव्हर्स बनली असून, त्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या सुविधा तिला उपलब्ध होतील, हे अर्थातच लक्षवेधी आहे.
मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणार्या स्पर्धकाला रत्नजडित मुकुट घातला जातो. याशिवाय एक लाख रुपये बक्षीस म्हणून मिळतं. स्पॉन्सर्स आणि इतर भेटवस्तू मिळून ही रक्कम आणखी वाढते. मिस युनिव्हर्सला न्यूयॉर्कच्या मिस युनिव्हर्स अपार्टमेंटमध्ये एक वर्ष राहण्याची सुविधा मिळते. तिथे तिचे कपडे, मेकअप आणि किचनपर्यंत सर्व सुविधा या मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनकडून दिल्या जातात. यासोबतच ऑर्गनायझेशन मिस युनिव्हर्सला जगभरातील सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर्ससुद्धा उपलब्ध करून देते. मॉडेलिंगसाठी तिचा पोर्टफोलियो तयार करतात. एक असिस्टंट आणि प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टची एक संपूर्ण टीम दिली जाते. ही टीम तिच्या मेकअप, हेअर प्रॉडक्ट, चप्पल, कपडे, ज्वेलरी आणि स्कीन केअर अशा सर्व गोष्टींची काळजी घेते. या सुविधांसोबतच मिस युनिव्हर्सला काही जबाबदार्याही सोपवल्या जातात. ती मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनची मुख्य अॅम्बेसेडर असते. म्हणजेच तिला या ऑर्गनायझेशनकडून आयोजित केल्या जाणार्या प्रत्येक पार्टी, पत्रकार परिषद आणि चॅरिटी इव्हेंटस्मध्ये उपस्थित राहावं लागतं. मिस युनिव्हर्सला ऑर्गनायझेशनसोबत जगभर फिरण्याची संधी मिळते. मिस युनिव्हर्सच्या प्रवास आणि हॉटेलचा सर्व खर्चसुद्धा ऑर्गनायझेशनकडून दिला जातो. भारतात आतापर्यंत 1994 - सुष्मिता सेन, 2000 - लारा दत्ता, 2021 - हरनाथ संधू या मिस युनिव्हर्स झाल्या आहेत, हेदेखील येथे लक्षवेधी आहे.