शेंद्रा एमआयडीसीमध्ये मद्यनिर्मिती करणाऱ्या रॅडिको डिस्टिलरी कंपनीत १५ वर्षे जुनी टाकी वेल्डिंग करताना फुटली. या दुर्घटनेत ३.५ लाख किलो मक्याच्या ढिगाऱ्याखाली दबून चार मजुरांचा मृत्यू, तर चार मजूर जखमी झाले होते. या घटनेला घडून ५२ तास झाल्यानंतर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला. सेफ्टी मॅनेजर सुरेंद्र खैरनार, सहाय्यक मेंटेनन्स मॅनेजर महादेव पाटील, लेबर काॅन्ट्रॅक्टर ज्ञानेश्वर रिठे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. कंपनीतील ज्युनिअर मॅनेजर प्रकाश मधुकर काकड (३६, एन-९, सिडको) यांनी तक्रार दिली. शुक्रवारी सकाळी दहा वाजता या टाकीच्या वेल्डिंगचे काम सुरू करण्यात आले होते. ५० फूट उंचीच्या टाकीला ३० फुटांच्या उंचीवर वेल्डिंग करण्यात येत होते. दुपारी अडीच वाजता ही टाकी कोसळली. मक्याच्या ढिगाऱ्याखाली चार मजूर मृत्युमुखी पडले, तर चार जखमी झाले होते. या प्रकरणी तिघांवर करमाड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, ३/५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सुरक्षेकडे दुर्लक्षाची तक्रार रॅडिको कंपनीत टाकीतून (सायलो) दोन दिवसांपासून त्यातून मक्याची गळती होत होती. ती थांबवण्याचे आदेश आरोपींनी काकड यांना दिले, परंतु सुरक्षेसाठी यंत्रणा पुरवली नाही. त्याचबरोबर याबाबत त्यांना कोणतेही मार्गदर्शन केले नाही. अपुरी साधने वापरून काम करताना जीवित हानी होऊ शकते, यांची जाणीव असतानाही आरोपींनी उपाययोजना केल्या नाहीत, असे तक्रारीत म्हटले आहे. १० वर्षांपर्यंत कारावास भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ नुसार, आजीवन किंवा ५ वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद आहे, परंतु ही शिक्षा १० वर्षांपर्यंत वाढवता येईल. हा गुन्हा अजामीनपात्र आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)