Devendra Fadnavis Interview : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. आता नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे या गोष्टींची चर्चा पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांनी याबद्दल एक विधान केले होते. त्यावरुन विरोधकांनी टीका केली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे आणि एक रहेंगे तो सेफ रहेंगे यावर एक प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले.
कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे यात काय चूक आहे. या देशाचा इतिहास बघा, या देशात जेव्हा जेव्हा आम्ही प्रांत, भाषा, देश, जातींमध्ये विभागलो गेलो तेव्हा तेव्हा हा देश गुलाम झाला. देश कटला, माणूस कटला. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे हे सत्य आहे. त्यापेक्षा जास्त सत्य काय एक रहेंगे तो सेफ रहेंगे यावर इतकी मिरची लागण्याचे कारण काय? मी समाजाला एक राहा असे सांगतोय, मग तुम्हाला इतकी मिरची का लागते? यामुळे यात काहीही आक्षेपार्ह नाही. मला यात काही आक्षेपार्ह आहे हे दाखवून द्याव, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देशाचे पंतप्रधान जर एकत्र राहा म्हणजे आपण सेफ राहू असे सांगत असेल तर त्यात चुकीचे काय. कोणत्याही देशाचा पंतप्रधान एकत्र राहा तर सुरक्षित राहू, असेच सांगत असेल तर त्याची मिरची लागण्याचे कारण काय. शरद पवारांमध्ये लपलेला जातीवाद हा उफाळून येतो, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.