Published on
:
18 Nov 2024, 6:24 am
Updated on
:
18 Nov 2024, 6:24 am
चालू वर्षी मुळा साखर कारखान्याने 12 लाख टन गळिताचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी ऊसतोडणीसह अन्य नियोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी केले.
मुळा साखर कारखान्याच्या 47 व्या ऊस गळीत हंगामास रविवारी (दि. 17) अध्यक्ष नानासाहेब तुवर व उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी
कारखान्याचे संचालक भाऊसाहेब मोटे व उषाताई मोटे, तसेच संजय जंगले व मीनाताई जंगले यांच्या हस्ते गव्हाणीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर गव्हाणीत उसाची मोळी टाकून हंगामाचा प्रारंभ झाला.
तुवर म्हणाले, यंदा मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणेही भरली आहेत. जायकवाडी जलाशयात दोन वर्षे पुरेल इतका पाणीसाठा आहे. ऊसउत्पादनही चांगले आहे. 12 लाख टनाचे गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाने व्यवस्थित नियोजन केले असल्याचे सांगून शेतकर्यांनी कोणाच्याही आमिषाला बळी न पडता त्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस मुळा कारखान्यालाच गळीतासाठी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
उपाध्यक्ष कर्डिले यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. सचिव रितेश टेमक यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संचालकांसह मुकादम, सभासद व कर्मचारी व ऊसतोडणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.