Published on
:
18 Nov 2024, 4:30 am
Updated on
:
18 Nov 2024, 4:30 am
मायक्रोवेव्ह वापरणं सोपं; पण त्याची देखभाल करणं, काळजी घेणं, त्याची स्वच्छता सांभाळणं अवघड, असं अनेकजणांना वाटतं. प्रत्यक्षात ही देखभाल आणि स्वच्छता वाटते तितकी अवघड नसते. त्याची गरज आणि तंत्र समजून घेणं मात्र आवश्यक ठरतं.
मायक्रोवेव्हची नियमित स्वच्छता न केल्यास त्याची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते. एवढंच नाही, तर मायक्रोवेव्ह स्वच्छ नसेल तर त्यामध्ये शिजवलेलं अन्न खराब होऊ शकतं. मायक्रोवेव्हमध्ये उबदार आणि दमट वातावरण निर्माण होतं. त्यामुळे जीवाणू आणि बुरशीची वाढ होऊ शकते. अन्नाचे कण किंवा वास मायक्रोवेव्हमध्ये राहून गेला तर नवीन शिजवलेल्या, गरम केलेल्या अन्नाच्या चवीवर आणि स्वादावर त्याचा परिणाम होऊ शकतो. हे टाळायचं असेल, तर मायक्रोवेव्हची नियमित आणि निगुतीने स्वच्छता करायला हवी. या स्वच्छतेचं समजायला व प्रत्यक्षात आणायला अगदी सोपं तंत्र पुढे टप्प्याटप्प्यात नोंदवलं आहे.
स्वच्छता करण्यापूर्वी नेहमी प्लग काढून ठेवा आणि मायक्रोवेव्ह संपूर्ण गार होऊ द्या.
प्रत्येक वापरानंतर मायक्रोवेव्हचा आतला भाग पाण्याने पुसून टाका.
एका वाटीत कोमट पाण्यात सौम्य साबण घाला. मऊ कापड किंवा स्पंज त्यात भिजवून मायक्रोवेव्हच्या आतल्या भिंती स्वच्छ करा. अन्नाचे पडलेले किंवा चिकटलेले कण काढून टाका.
एक वाटी पाणी आणि एक वाटी व्हिनेगर एका माइक्रोवेव्ह-सेफ वाटीत घाला. मायक्रोवेव्हमध्ये ५- १० मिनिटं ते गरम करा. यामुळे आतली घाण मऊ होऊन सहजतेने निघून येईल. मायक्रोवेव्ह बंद करून वाफ काढून टाका आणि मऊ कापडाने स्वच्छ करा. व्हिनेगरचं द्रावण दुर्गंधी आणि जीवाणू दूर करण्यास हातभार लावतं.
मायक्रोवेव्हच्या बाहेरच्या बाजूला असलेली बटणं आणि हॅण्डलही स्वच्छ ठेवा.
माइक्रोवेव्हची प्लेट आणि रिंग काढून गरम पाण्यात धुवा. गरज भासल्यास सौम्य साबण वापरा.
अशा सोप्या आणि घरगुती पद्धतींचा अवलंब करून मायक्रोवेव्ह स्वच्छ, सुरक्षित आणि कार्यक्षम ठेवणं शक्य होईल.