भिवंडीच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या ढाब्यांवर उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी होत आहे.Pudhari News Network
Published on
:
18 Nov 2024, 6:41 am
Updated on
:
18 Nov 2024, 6:41 am
भिवंडी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भिवंडीच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या ढाब्यांवर उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी होत असून, खाण्यापिण्या व्यतिरिक्त अनेक व्यवहार केले जात आहेत. हे ढाबे बंद करण्याकडे पोलिसांकडून गांर्भीयाने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे ढाबा मालक आचारसंहितेचा भंग करत आहेत. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभाग, पोलीस आणि आचारसंहिता पथकामार्फत कारवाई करण्याची मागणी मतदारांकडून केली जात आहे.
भिवंडीतून जाणार्या मुंबई-नाशिक,भिवंडी-नाशिक,ठाणे,वाडा,वसई आणि पारोळ मार्गावरील ग्रामीण भागात सुमारे 150 छोटे-मोठे ढाबे सुरू आहेत, ज्यात केवळ भिवंडीच नव्हे तर ठाणे, मुंबई, शहापूर, नाशिक आणि वसई जिल्ह्यांतील लोक चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात.विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.परिणामी सर्व प्रतिष्ठाने नियमानुसार रात्री 11 नंतर बंद ठेवणे अपेक्षित आहेत. स्थानिक पोलिसांनी रात्री 11 वाजेनंतर ढाबे बंद ठेवण्याचे आदेश दिले असूनही रात्री दोन वाजेपर्यंत ढाबे गजबजलेले दिसत आहेत.तर ढाब्यावर मद्यपानास बंदी असताना अनेक धाब्यावर देखील राजरोसपणे दारूच्या पार्ट्या आणि हुक्का पार्लर सुरु असतात.अशा सर्व ढाब्यांवर निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे समर्थक रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करून मतदारांना प्रभावित करत आहेत. त्याकडे आचारसंहिता पथक दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
ग्रामीण भागातील सर्वच छोटे-मोठे ढाबे हाऊसफुल्ल झाले असून या ढाब्यांवर तासनतास रांगा लागल्याने हे ढाबे रात्री उशिरापर्यंत उघडे असतात.मात्र सर्व ढाबा मालकांचे म्हणणे आहे की ते नियमानुसारच ढाबा चालवत आहेत. याबाबत भिवंडी ग्रामीण भागातील निवडणूक निर्णय अधिकार्यांशी संपर्क होऊ शकला नाही.