बबनराव पाचपुते यांची जाहीर सभाpudhari
Published on
:
18 Nov 2024, 6:44 am
Updated on
:
18 Nov 2024, 6:44 am
तब्बत सात वेळा विविध चिन्हावर निवडणूक लढवित श्रीगोंद्याचे प्रतिनिधीत्व करणारे बबनराव (दादा) पाचपुते वयाच्या सत्तरीत पोहचले. काष्टीतील ज्या भैरवनाथ चौकातून दादांची राजकीय कारकिर्द सुरू झाली, त्याच चौकात ते आमदार म्हणून शेवटचे भाषण करणार आहेत. संघटन कौशल्य, आमदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष अशी पदं भूषवित वकृत्वाने जनमनावर अधिराज्य गाजविणारे दादा अखेरच्या भाषणात काय बोलणार? याकडे श्रीगोंदेकराचे लक्ष लागले आहे. आज सोमवारी काष्टी येथील भैरवनाथ चौकात दुपारी ते समर्थक आणि मतदारांशी संवाद साधणार आहेत.
जनता पक्ष, जनता दल, काँग्रेस, अपक्ष आणि भाजपा असा राजकीय प्रवास राहिलेले दादा आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळेच त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची जबाबदारी चिरंजीव विक्रमसिंह यांनी उचलली आहे. महायुतीकडून ते विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मुलगा उमेदवार असला तरी आजपर्यंत दादांनी एकही सभा घेतली नाही. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने त्यांनी मनातील भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेत काष्टीत सभेचे आयोजन आले आहे. आमदार म्हणून दादांचा हा शेवटचा संवाद श्रीगोंदेकरांसोबत होणार आहे.
1 जानेवारी 1977 रोजी बबनदादांचे राजकीय पदार्पण झाले होते. जनता पार्टीच्या शाखेच्य उद्घाटनापासून सुरूवात करत संघटन कौशल्याच्या जोरावर ते मंत्री, प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहचले. आणीबाणीच्या काळात असहकार आंदोलनात सरकारविरोधात आवाजही उठवला. 9 सप्टेंबर 1977 ला दादा पहिल्यांदा पंचायत समितीचे सदस्य झाले. 1979 मध्ये ’शेतकरी संघटनेची’ स्थापन आणि 1980 मध्ये दादा पहिल्यांदा विधानसभेत पोहचले. 9 वेळेस विधानसभा लढविणारे बबनदादा सात वेळेस विजयी झाले. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवित त्यांनी आमदारकी जिंकली अन् आपले वकृत्वाने राजकीय सभा जिंकल्या.
पदाच्या माध्यमांतून त्यांनी श्रीगोंद्याचा विकास केला. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक कल्याणकारी योजना राबवित लाभार्थ्यांना लाभ दिला. बबनदादांच्या रुपाने 2019 मध्ये श्रीगोंद्यात प्रथम भाजपचे कमळ फुलले. 1980 आणि 1985 मध्ये जनता पक्षाकडून, 1990 ला जनता दलाकडून विजयी झालेले बबनदादा 1995 ची निवडणूक काँग्रेसकडून लढले अन् विजयी झाले. 1999 च्या निवडणुकीत मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली, पण राष्ट्रवादीने त्यांना मानाचे प्रदेशाध्यक्ष पद दिले. 2004 ची निवडणूक अपक्ष लढले अन् पुन्हा आमदार झाले. या काळात त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली. 2009 मध्ये पुन्हा आमदार झालेले बबनदादांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले. 2014 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश करत निवडणूक लढविली, पण निसटत्या म्हणजे 12 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये पुन्हा भाजपकडून विधानसभा लढविली अन् श्रीगोंद्यात भाजपचे कमळ फुलले.
सात टर्म आमदार राहिलेल्या बबनदादांच्या वाट्याला कायमच संघर्ष आला. पण कार्यकर्ते व इच्छाशक्तीच्या जोरावर त्यावर मात करत ते यशस्वी राजकारणी म्हणून ओळखले जावू लागले.दुर्देवाने त्यांना आजाराने ग्रासल्याने त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला अन् राजकीय वारसा चिरंजीव विक्रमसिंह यांच्याकडे सोपविला. आजारी असतानाही ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र एकही सभा त्यांनी घेतली नाही. आता प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी ज्या चौकातून राजकीय सुरूवात झाली, त्या भैरवनाथ चौकात आमदार म्हणून ते कार्यकर्त्यांशी शेवटचा संवाद साधणार आहेत. ते काय भूमिका मांडणार, कोणती साद घालणार? याकडे श्रीगोंदेकरांचे लक्ष लागून आहे.