Published on
:
18 Nov 2024, 4:33 am
Updated on
:
18 Nov 2024, 4:33 am
रायगड | गेली दीड-दोन महिने विधानसभा निवडणुकीमुळे रायगड जिल्हयातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून सोमवारी सायंकाळी प्रचाराच्या थंडावणार आहेत. त्यामुळे जिल्हयात छुप्या प्रचाराला वेग येणार आहे. शिवाय समाजमाध्यमांवर प्रचार रंगणार आहे.
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात सरळ आणि तिरंगी लढतींचे चित्र आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असला तरी काही ठिकाणी मित्र पक्ष व अपक्षांनी चुरस निर्माण केली आहे. मात्र यावेळी जिल्हयात राज्यातील मोठ्या नेत्यांचा मोजक्याच सभा झाल्या, त्यामुळे निवडणूक प्रचार नेहमीप्रमाणे रंगला नसल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील नेत्यांची किल्ला लढविल्याचे दिसून आले.
रायगड जिल्हयात राज्याप्रमाणे महायुती आणि महाविकास आघाडी अशी सरळ लढत होईल सांगितले जाते होते. जागा वाटपानंतर इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने अखेर उरण, पनवेल, कर्जत, अलिबाग, पेण आणि श्रीवर्धनमध्ये मित्र पक्ष व अपक्षांनी उमेदवार अर्ज दाखल केले आहेत.
रायगड जिल्हयात एकूण 73 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवड लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 4 नोव्हेंबरपासून जिल्हयात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. अलिबाग मतदारसंघात महायुतीचे महेंद्र दळवी विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत शेकापच्या चित्रलेखा पाटील विरुद्ध भाजपचे बंडखोर अपक्ष दिलीप भोईर अशी लढत आहे. या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांसाठी खा. सुनील तटकरे, खा. श्रीरंग बारणे यांची एक कार्नर सभा झाली. या व्यतिरिक्त मोठ्या सभा झालेल्या नाहीत. उमदेवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिल्याचे दिसून येत आहे.
पेण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे रवींद्र पाटील विरुद्ध शेकापचे अतुल म्हात्रे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे प्रसाद भोईर यांच्यात तिरंगी लढत आहे. महायुतीतर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. पनवेलमध्ये महायुतीकडून आ. प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा झाली आहे. उरणमध्ये महाविकासआघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची सभा झाली. श्रीवर्धनमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली आहे. महाडमध्ये मोठ्या नेत्यांच्या सभा झालेल्या नाही. सोमवारी शेवटच्या दिवशी जिल्ह्यात मोठ्या सभांचे आयोजन नाही.
उमेदवारांनी गाव बैठकांवर भर दिला आहे. शिवाय समाजमाध्यमांचाही वापर वाढविला आहे. जिल्ह्यातील खा. सुनील तटकरे, शेकाप नेते माजी आमदार जयंत पाटील यांच्या सभा झाल्या आहेत. स्थानिक पातळीवरून मोठा प्रचार झाला आहे.
बैठका, प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी, पँम्पेटस, बॅनर्स, रिक्षा आदी वाहनांवर घोषणा देणे यासह समाजमाध्यमांवर उमेदवारांनी आपला जोरदार प्रचार केला आहे.
18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रचाराची मुदत संपत आहे. त्यामुळे जिल्ह्यात जाहीर प्रचार बंद होणार असून छुप्या प्रचाराला वेग येणार आहे.