शहरात उडणार राजकीय धुराळा; राष्ट्रीय नेते उतरले प्रचारातPudhari
Published on
:
18 Nov 2024, 2:01 am
Updated on
:
18 Nov 2024, 2:01 am
Pune Politics: गेला महिनाभर सुरू असलेला विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी (दि. 18) सायंकाळी 5 वाजता थांबत आहे. त्यामुळे प्रचार सभा, पदयात्रांना विराम मिळणार असला, तरी 20 रोजी होणार्या मतदानाच्या दिवशीचे नियोजन आखण्यात उमेदवार आणि त्यांंचे कार्यकर्ते यांच्यासाठी आगामी 48 तास महत्त्वाचे आहेत.
मतदानाला समोरे जाण्याआधी अवघ्या दोन रात्रीच उरल्याने सर्वच जण दोन्ही रात्री जागरण करणार आहेत. तर, दुसर्या बाजूला रात्रींच्या हालचालीवर निवडणूक आयोगाच्या 18 पथकांची करडी नजर राहणार असून, त्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त शहरात सर्वत्र तैनात ठेवण्यात आला आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 15 ऑक्टोबर रोजी लागू झाली. त्यानंतर उमेदवार निवडी आणि तिकीटवाटपांत दहा दिवस गेले. त्यामुळे उमेदवारांचा प्रत्यक्ष प्रचार ऐन दिवाळीत म्हणजे 25 ते 27 ऑक्टोबरपासून सुरू झाला.
दिवाळी पहाट कार्यक्रमांसह मतदारांच्या भेटीगाठीसाठी उमेदवार सजून-धजून भल्या पहाटे बाहेर पडलेले दिसले. दिवाळी संपताच 4 नोव्हेंबरपासून राज्यात प्रचारसभांची रणधुमाळी सुरू झाली. शहरात 12 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होताच प्रचार शिगेला पोहोचला. सर्वच पक्षांतील दिग्गज नेते, स्टार प्रचारकांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी जोर लावण्यासाठी शहरात सभा घेतल्या.
शहरात आज रॅलींचा धूम
सोमवारी 18 रोजी सायंकाळी 5 वाजता एक महिना तीन दिवसांनंतर प्रचाराची रणधुमाळी थांबणार आहे. त्यामुळे सोमवारी पहाटेपासून सायंकाळी 5 पर्यंत शहरात निर्णायक रॅली होतील. त्यासाठी कार्यकर्ते अन् उमेदवार दुप्पट जोमाने कामाला लागले आहेत. 20 रोजी मतदान असल्याने 18 आणि 19 नोव्हेंबरच्या रात्रीवर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे.
नऊ स्थिर अन् नऊ फिरती पथके
शहरातील आठ मतदारसंघांवर करडी नजर ठेवण्यासाठी नऊ स्थिर पथके आणि नऊ फिरत्या पथकांचा वॉच असणार आहे. यात पोलिसांसह जिल्हा प्रशासनातील कर्मचारी यांचाही सहभाग असाणार आहे. रात्री विनाकारण फिरणार्या गाड्यांवर प्रामुख्याने आगामी दोन दिवस या पथकांचा वॉच राहील. तसेच आपल्या मतदारसंघात कुणी बाहेरच्या व्यक्ती तर येत नाही ना यावरही कार्यकर्तेही बारीक नजर ठेवून आहेत.