ज्याच्याप्रति निष्ठा आहे, तो नेता आमदारकीच्या निवडणुकीत हरला. त्यामुळे मनाला झालेले दुःख त्याने प्रत्यक्षात उतरवले आणि शपथ घेतली माझा नेता जोपर्यंत आमदार होणार नाही, तो पर्यंत पायात चप्पल घालणार नाही. आता येत्या शनिवारी मतदार ठरवणार रावसाहेबाला पायात चप्पल चढवायची की पुन्हा अणवानी फिरू द्यायचे. कुकाणे जवळील जेऊर हैबती या गावातील रावसाहेब फुलमाळी हा भटक्या समाजातील गरीब कार्यकर्ता. तो कोणत्याही पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता नसला तरी त्याची 'विठ्ठल' भक्ती चर्चेचा विषय ठरत असलेली. रावसाहेब त्याच्या वस्तीवरील सनई वाद्य पार्टीत रोजंदारी करतो. तो महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघेया नेत्याला मानतो, तो नेता २००९ साली आमदारकीच्या निवडणुकीत अवघ्या ८०० मतांनी हरल्याने रावसाहेबाने एक पण केला की माझा नेता जोपर्यंत आमदार होणार नाही, तोपर्यंत मी माझ्या पायात चप्पल घालणार नाही. त्याचा नेता २०१४ साली नेवासे विधानसभा मतदार संघातून उमेदवारी झाली नाही. त्यामुळे २००९ ते २०२४ असा काळ रावसाहेब याचा आणवानीच गेला. यावेळी मात्र विधानसभा निवडणुकीत रावसाहेबच्या नेत्याला उमेदवारी मिळाली. त्यामुळे त्याचा नेता विजयी झाला, तर रावसाहेब चप्पल घालण्याचा योग येणार आहे. पण पराभव झाला, तर पुन्हा पुढचे पाच वर्षे रावसाहेब विनाचप्पल दिसणार आहे. त्याच्या या शपथेची राजकीय, सामाजिक वर्तुळत मोठी चर्चा आहे. आपल्या नेत्याप्रति निष्ठावंत कार्यकर्ते शोधून सापडणे मुश्किलीचे होत असताना गरिबा घरचा हा रावसाहेब त्याच्या आवडत्या नेत्याप्रति सोळा वर्षे पायाला उन्हा तान्हाचे चटके सहन करू शकतो. नेत्यावरील निष्ठा, प्रेम, निस्वार्थपणा याचेच हे उदाहरण आहे. रावसाहेबला प्रतीक्षा आहे आता २३ नोव्हेंबरच्या निकालाची विधानसभेचा निकाल त्याला पायात चप्पल घालायला लावतो की पुन्हा आणवानीच ठेवतो हे जनताच ठरवणार आहे. असे असले तरी रावसाहेब, त्याची गरिबी, त्याच्या आवडत्या नेत्यावरील त्याचे जीवापाड प्रेम हे आजच्या राजकीय नेते व कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. दरम्यान, नेवासे मतदारसंघात फुलमाळी यांची निष्ठा चर्चेचा विषय ठरली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)