Published on
:
18 Nov 2024, 6:17 am
Updated on
:
18 Nov 2024, 6:17 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कारचालकाने अचानक ब्रेक लावताच पाठीमागून दुचाकीस्वार धडकून रस्त्यावर उजव्या बाजूला पडला. त्याला समोरून भरधाव आलेल्या पिकअपने चिरडले. हा भीषण अपघात शुक्रवारी (दि.१५) सकाळी पावणे बाराच्या सुमारास पडेगावजवळ घडला. दयानंद शमुवेल कारके (३८, रा. सप्तशृंगी नगर, पडेगाव) असे मयताचे नाव आहे.
फिर्यादी संदीप कारके (४२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ दयानंद हे वाहनचालक म्हणून काम करत होते. ते शुक्रवारी सकाळी दुचाकीने (एमएच-२०-सीबी-०१९५) घरातील सामान घेण्यासाठी मिटमियाच्या दिशेने निघाले होते. पडेगाव रस्त्यावरील देशी हॉटेलसमोर त्याच्या समोर असलेल्या कारचालकाने (एमएच-२०-ईई-५६९२) अचानक ब्रेक लावले. कारच्या पाठीमागे असलेले दयानंद हे कारला धडकून रस्त्याच्या उजव्या बाजूला पडले.
त्याचवेळी मिटमिटा येथून भरधाव येणाऱ्या पिकअपने (एमएच-४८-एवाय ०५८३) दयानंद याना चिरडले. त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ अस्वस्थेत त्यांना नागरिकांनी घाटीमध्ये हलविले. डॉक्टरांनी दयानंद यांना तपासून मयत घोषित केले. दयानंद यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी कारचालक आणि पिकअप चालकाविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारचालक करत होता ओव्हरटेक
कारचालक हा दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत होता. त्याच कारच्या पाठीमागे दयानंद यांची दुचाकी होती. समोरून पिकअप आल्याने कारचालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे दयानंद हे कारला पाठीमागून धडकून उजव्या बाजूला पडले. त्याच पिकअपने त्यांना चिरडले.