आळेफाटा पोलिसांसाठी कर्मचारी वसाहत नाही:पोलिस ठाण्यात अपुरे मनुष्यबळ, छोट्या खोलीतून चालतोय पोलिस ठाण्याचा कारभार‎

2 hours ago 1
दिवसभरात ५५० गाड्यांचे सुमारे १०५ थांबे, पिपळवडी ते आळेखिंड, वडगाव आनंद ते व्हरुडी, मंगरूळ ते नळावणे दरम्यानची तब्बल ४२ किलोमीटरची विस्तीर्ण हद्द, दररोज दाखल होणारे गुन्हे, गेल्या तीस वर्षांपासून पोलिस कर्मचारी संख्येत वाढ नाही, महिला कोठडीही नाही, गुन्ह्यांचा तपास व दररोजची ड्युटी यात भरडले जाणारे पोलिस कर्मचारी, गुन्ह्यात हस्तगत केलेला माल ठेवण्यासाठी नसलेली स्वतंत्र खोली आणि हा सारा कारभार हाकण्यासाठी मिळालेली एक छोटीशी खोली अशी जर्जर अवस्था सध्या आळेफाटा पोलिस ठाण्याची झाली असल्याचे पहावयास मिळत आहे. आळेफाटा परिसरात गुन्हेगारीत अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असली, तरी आळेफाटा पोलिस ठाण्याच्या समस्या मात्र जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. या समस्यांचा सामना करीत सेवा बजावणारे येथील पोलिस कर्मचारी कामाच्या भाराने मेटाकुटीस आले आहेत. आळेफाटा पोलिस ठाण्याला लागलेले समस्यांचे ग्रहण आजही कायम आहे. राज्याच्या गृह खात्याला या पोलिस ठाण्याच्या सक्षमीकरणाचा जणूकाही विसरच पडला असल्याचे चित्र सध्या दिसून येते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेला या पोलिस ठाण्याचा कारभार अनेक पटींनी वाढूनही आजही त्याच छोट्याशा खोलीतून सुरू आहे. या पोलिस ठाण्यात सन २०१६ सालापासून पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या साठ वाढवण्याची आवश्यकता असतानाही अद्याप ती वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे अवघ्या पंचेचाळीस मनुष्यबळ व जागेच्या कमतरतेमुळे या पोलिस ठाण्याच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. आळेफाटा पोलिस ठाण्यात महिलांसाठी ड्रेसिंग रूमची सुविधाही उपलब्ध झालेली नाही. पुरेसे कर्मचारी उपलबध व्हावेत व जागेची अडचण सोडविण्यात यावी, यासाठी स्थानिक अधिकारी वरिष्ठ कार्यालयांकडे लेखी विनंती दरवर्षी करीत आलेले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्षच करण्यात येत असल्याची स्थिती आहे. आळेफाटा पोलिस ठाण्यात सध्या महिला कोठडी नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article