चार दिवसात तीन रोहित्र खराब; रब्बी हंगामातील पिके धोक्यात, तक्रारीनंतरही अचलपूर तालुक्यातील संबंधित विभागाचे दुर्लक्ष
2 hours ago
1
रोहित्र सतत खराब होत असल्याने अचलपूर तालुक्यातील सावळी बु. येथील बहुतांश शेतकऱ्यांची सिंचनाखाली असलेली पिके धोक्यात आली आहे. दरम्यान वारंवार तक्रारी करूनही महावितरणचे अधिकारी, कर्मचारी दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याचा या भागातील नागरिक, शेतकऱ्यांचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी असदपूर वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सावळी बु. येथील दिनकर गावंडे यांच्या शेतातील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी अभियंत्यांना माहिती देत हे रोहित्र दुरुस्त करण्याची मागणी केली. महावितरणने हे खराब झालेले रोहित्र दुरुस्तीसाठी २० ते २५ दिवसांचा कालावधी लावला. त्यानंतर नव्याने लावलेले रोहित्र पुन्हा नादुरुस्त झाले अशा प्रकारे तीनदा रोहित्र नव्याने बसवूनही शेतकऱ्यांची समस्या मात्र निकाली निघाली नाही. विद्युत विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत रोहित्र दुरुस्तीच्या नावावर मोठ्या प्रमाणात घोळ असल्याची बाब नाकारता येत नाही. नवीन आणलेले रोहित्र एकदा नव्हे तीनदा नादुरुस्त होणे हे यात मोठा घोळ असल्याचे स्पष्ट करत आहे. एकीकडे पॉवर ऑन व्हील ही संकल्पना महावितरण कंपनीकडून राबवली जात असताना शेतकऱ्यांना मात्र रोहित्र नादुरुस्त असल्याने पाण्याविना पिकाचे नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या हरभरा, गहू व संत्र्याला पाणी देण्यासाठी शेतात कृषिपंप सुरू ठेवणे आवश्यक आहे. मात्र मुळातच नवीन रोहित्र दर्जाहीन असल्याने ते सतत खराब होत आहे. परिणामी त्याचा मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सावळी बु. येथील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रोहित्र दुरुस्तीच्या नावावर शेतकऱ्यांना होणारा त्रास थांबवणे गरजेचे आहे. असदपूर येथील अभियंत्यानी विद्युत रोहित्र दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलली तरी वरिष्ठ कार्यालयाकडून विद्युत रोहित्र पुरवठ्या दरम्यान होत असलेल्या घोळाची चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. तीनवेळा दुरुस्ती तरीही दोष कायमच सावळी बु. येथील दिनकर गावंडे यांच्या शेतातील रोहित्र जळल्यानंतर २० ते २५ दिवस ते दुरुस्त झाले नाही. शिवाय एकदा दुरुस्त केल्यानेही भागले नाही. त्यामुळे दोनवेळा नव्याने पाठवण्यात आले. अशाप्रकारे तीनवेळा दुरुस्ती केली गेली. परंतु तिसरे रोहित्रही बंद पडले. अशाप्रकारे तीन रोहित्र खराब झाल्याने शेतकऱ्यांनी सिंचन कसे करावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)