शक्तिप्रदर्शनासह प्रचाराचा सुपर संडे; मतदानासाठी उरले फक्त 48 तास:नेतेमंडळी एकमेकांचा ‘हिशेब’ चुकता करण्यात दंग; 160 उमेदवार रिंगणात

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असून, सोमवार, १८ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता जिल्ह्याच्या आठही विधानसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार थांबणार आहे. त्यानंतर मतदानाला ३६ तास उरतील. त्यामुळे प्रचाराला वेग आला. रॅली, सभांच्या माध्यमातून उमेदवार शक्तिप्रदर्शन करत आहेत. या वेळी नेते सभांच्या माध्यमातून एकमेकांचा हिशेब चुकता करण्यासाठी धडपडत असताना मतदार मात्र विकास, वल्गनांची बेरीज-वजाबाकी करण्यात व्यस्त आहेत. निवडणूक आली की, आपण कसे जनतेच्या हिताचे रक्षक आहोत, हे दाखवण्याचा प्रत्येक उमेदवाराकडून प्रयत्न सुरू असतो. मतदानासाठी दोन दिवस शिल्लक असल्याने मतदारांनी उमेदवारांच्या विकास व वल्गनांचा हिशेब सुरू केला आहे. मतदारांच्या बेरीज-वजाबाकीचे उत्तर २३ नोव्हेंबरला मिळेल. कोण किती पाण्यात आहे, कोण शब्दाला जागले, विद्यमान आमदारांनी ५ वर्षांत किती कामे केली, किंवा जे आमदार नव्हते, ते जनतेच्या कामी आले की, केवळ मतासाठी हे पडताळत आहेत. प्रचार तोफा थंडावण्याच्या एक दिवस आधी रविवार आल्यामुळे बहुतेक नागरिक घरीच भेटत असल्याने आठही मतदारसंघातील सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला. त्यामुळे रविवार प्रचाराचा ‘सुपर संडे’ ठरला. मोठ्या नेत्यांच्या सभा, मोठ्या रॅली, मतदारांची गर्दी, फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर, मोठ्या घोषणा यामुळे जिल्ह्यात सर्वत्र निवडणुकीचा फीव्हर आहे. प्रत्येक उमेदवार शक्तिप्रदर्शन करण्यात व्यस्त राहिला. मतदारसंघातील महत्त्वाचा भाग पिंजून काढण्याचा प्रयत्न केला. उर्वरित भागात सोमवारी सायंकाळी ५ पर्यंत उमेदवार, कार्यकर्ते स्वत:ला प्रचारात झोकून देणार आहेत. प्रचार सभांदरम्यान उमेदवारांचे आरोप-प्रत्यारोपास प्राधान्य प्रचार सभांदरम्यान उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त राहिले. यामुळे मतदारांचे मनोरंजनही झाले. अनेकांनी वचपा घेण्याची भाषाही बोलून दाखवली. त्यावेळी मात्र, मतदारांनी कान टवकारले. कारण, आपण केलेल्या मतदानाच्या भरवशावर हे निवडून येतील. आपणच यांच्यावर विश्वास दाखवला, निवडून दिले. विकास कामांबाबत बोलण्याऐवजी हे वचपा घेण्याची भाषा बोलताहेत ही बाब मतदारांना खटकली. याचाही मतदार विचार करत आहेत. मतदारसंघाच्या विकासावर उमेदवारांनी बाळगले मौन मतदारसंघाच्या विकासावर बऱ्याच उमेदवारांनी मौन बाळगले. तेही मतदारांना खटकले. स्थानिक समस्या, विकासाच्या मुद्याला हात न घालता केलेल्या मोठ्या घोषणा मतदारांच्या पचनी पडल्या नाहीत. महागाई, बेरोजगारी, आरोग्य व शैक्षणिक सुविधांबाबत न बोलता एकमेकांचे उट्टे काढण्यातच काही नेते दंग झाल्याने मतदारांच्या मनाचा बेरंग झाल्याचे दिसून आले. यामुळेच निवडणुकीत मतदार विचारपूर्वक रंगत आणतील, असेच कट्ट्यांवरील चर्चांमधून समोर येत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article