रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स फाडले; भीमसैनिक संतप्तPudhari
Published on
:
08 Feb 2025, 8:00 am
Updated on
:
08 Feb 2025, 8:00 am
कोपरगाव: शहरात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने शहरात ठिक ठिकाणी शुभेच्छा फ्लेक्स लावण्यात आले होते. काल त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती कोपरगाव शहरात मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.
मात्र रात्रीतून धारणगाव रोड परिसरातील त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देणारे दोन फ्लेक्स फाडलेल्या अवस्थेत दिसून आल्याने भीमसैनिक संतप्त झाले, त्यामुळे कोपरगाव शहरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी भीमसैनिकांनी कोपरगाव बंद करत रस्त्यावर ठिय्या देत सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीही अशीच एक शुभेच्छा फलक फडल्याची घटना ताजी असताना, आज दोन शुभेच्छा फलक फाडण्यात आल्याने सकल आंबेडकरी समाज संतप्त झाला असून पोलिसांनी या आरोपीचा तपास लावून त्यास कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी होताना दिसत आहे.
आज सकाळी फ्लेक्स फडल्याची वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सकल आंबेडकरी समाज गोळा होऊन गाव बंदची हाक दिली व त्यानंतर सर्व गाव 100 टक्के बंद करण्यात आले तसेच बस आगरात जाऊन बसही बंद केल्या तर एक जमाव साईबाबा कॉर्नर येथे जाऊन नगर मनमाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. काही वेळानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून त्या जमावाला शांत करत वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान बॅनर फाडणाऱ्या आरोपीला पोलीसांनी शोधून अटक करावी यासाठी भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी ठिय्या देत आंदोलन सुरू केले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात सर्वत्र चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवला असून आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहे.
या घटनेने शहरात तणावाचे वातावरण आहे. हे आंदोलन बस स्थानक परिसरात झाल्यामुळे कोपरगाव बस स्थानकातील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. शहरातील संपूर्ण रिक्षा ही बंद ठेवण्यात आल्या आहेत.