अनंत इंग्लिश स्कूल येथे विधानसभेसाठी सहकुटुंब मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांशी खा. उदयनराजेंनी संवाद साधला. Pudhari Photo
Published on
:
21 Nov 2024, 1:03 am
Updated on
:
21 Nov 2024, 1:03 am
सातारा : राष्ट्रीय काँग्रेसकडे स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ सत्ता असताना याकाळात ‘गरिबी हटाव देश बचाओ, जय जवान जय किसान’ या चांगल्या घोषणा झाल्या. या घोषणा चांगल्या असल्या तरी त्याचा वापर हा मते मिळवण्यासाठी झाला. खा. शरद पवार यांनी केवळ घोषणाबाजी केली. नुसते हे करणार अन् ते करणार काहीच केले नाही. ऐन तारुण्यात त्यांनी काही केले नाही. आता मात्र त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल, अशी टीका खा. उदयनराजे भोसले यांनी केली. दरम्यान, राज्यात महायुतीचीच सत्ता येणार असून शिवेंद्रराजे विक्रमी मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अनंत इंग्लिश स्कूल येथे विधानसभेसाठी सहकुटुंब मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांशी खा. उदयनराजेंनी संवाद साधला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभाव ही संकल्पना होती. त्यामुळेच स्वराज्याची स्थापना झाली आहे. राज्य कारभारात लोकांचा सहभाग असावा, असा विचार असणारा राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लोकशाहीचा पाया रचण्याचे काम त्यांनी केले.
आज लोकांना प्रगतीच्या मागे जायचे असल्याने फक्त सातारा नव्हे तर राज्यात महायुतीचे उमेदवार विजयी होतील. लोकांना विकासकामे अपेक्षित असून ती या सरकारच्या काळात दिसत आहेत. महाविकास आघाडीने सत्ता असताना काहीही केले नाही. मशाल घेऊन त्या मशालवाल्यांनी कुठे कामे केली आहे, हे शोधावे लागत आहे. तुतारीवाल्या पवारांनी केवळ नुसती घोषणाबाजी केली आहे. नुसते हे करणार अन् ते करणार, काहीच केले नाही. महाराष्ट्रात यावेळीही महायुती सरकार सत्तेत येईल. आ. शिवेंद्रराजे भोसले हे महाराष्ट्रात मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही खा. उदयनराजेंनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत विचार आचरणात आणले
स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची केंद्रात व विविध राज्यात दीर्घकाळ सत्ता होती. याकाळात चांगल्या घोषणा झाल्या तरी त्याचा वापर हा मते मिळवण्यासाठी झाला. गरीब, जवान, किसान, महिला, तरुण यांच्यासाठी गत 60 वर्षांत काहीच झाले नाही. मागील 10 वर्षांत परिवर्तन घडले आणि मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात व राज्यात महायुतीची सत्ता आली. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे विचार मोदींनी आचरणात आणल्याचे खा. उदयनराजे यांनी सांगितले.