अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वर्षपूर्ती येत्या 22 जानेवारी रोजी आहे. त्यासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्येतील राममंदिराचे काम पूर्ण होण्यासाठी 1800 कोटी रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो, असे राममंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी म्हटले. 22 जानेवारी 2025 रोजी राममंदिर प्राणप्रतिष्ठेस एक वर्ष पूर्ण होत आहे. मंदिरास भव्य रूप देण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली. मंदिराच्या दुसऱया मजल्यावर राम दरबारची मूर्ती लावण्यात येणार आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यासाठी 800 कोटी रुपये लागले होते. आता दुसऱया मजल्याची निर्मिती आणि राममंदिरास भव्य स्वरूप देण्यासाठी 900 ते 1000 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.
काम कधी पूर्ण होणार…
मंदिराचे काम जून 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. राम दरबारात मूर्ती स्थापन करण्याचे काम पूर्णत्वाकडे येत आहे. मंदिराचा कळस निर्माण करण्याचे काम या महिन्यातच पूर्ण होणार आहे. मंदिराच्या शिखरावर दगड लावण्याचे काम सोडून इतर कामे पूर्ण होतील. या ठिकाणी 55 हजार क्यूबिक फुटांपर्यंत दगड लावणे बाकी आहे. खांब आणि भिंतींवरील मूर्तिकाम 75 टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेय.