हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिच्यासह झुंजार वृत्तीचा लक्ष्य सेन आणि फॉर्मात असलेली मालविका बनसोड यांनी आपापले सामने जिंकून चीन मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत विजयी प्रारंभ केला.
महिला गटात सिंधूने क्रमवारीत आपल्यापेक्षा सरस असलेल्या थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान हिला 50 मिनिटांत 21-17, 21-19 असे पराभूत केले.
36 व्या क्रमांकावरील मालविकाने डेन्मार्कच्या 21 व्या क्रमांकावरील लिने होजमार्क जाएर्सफेल्ट हिच्यावर 20-22, 23-21, 21-16 असा सनसनाटी विजय मिळवला.
पुरुष गटात लक्ष्यने मलेशियाच्या सातव्या मानांकित ली जि जिया याच्यावर 57 मिनिटांत 21-14, 13-21, 21-13 असा विजय मिळवला. या विजयासह त्याने मागील कांस्यपदकाच्या लढतीतील पराभवाचा वचपा काढला. लक्ष्यचा सामना आता डेन्मार्कच्या रास्मस गेमके आणि जपानच्या केंटा निशिमोटो यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. लक्ष्य पॅरिस ऑलिम्पिकपमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत आघाडी मिळवल्यानंतरही पराभूत झाला होता. लक्ष्यने पहिल्या गेममध्ये 11-4 अशी आघाडी घेत हा गेम जिंकला. लीने दुसरा गेम 17-8 अशा आघाडीनंतर जिंकत बरोबरी साधली.
सिंधूचा बुसाननवर विजय
जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानी असलेल्या पी. व्ही. सिंधू हिचा 11 व्या मानांकित बुसाननविरुद्ध 21 सामन्यांतील हा 20वा विजय ठरला. दोघींनी बरोबरीत सुरुवात केली. सिंधूच्या चुकांचा फायदा घेत बुसाननने 14-10 अशी आघाडी घेतली. सिंधूने 19-14 अशी आघाडी घेत पहिला गेम जिंकला. दुसऱया गेममध्ये बुसाननने शानदार सुरुवात केली आणि आघाडी घेतली, पण सिंधूने जबरदस्त पुनरागमन करत विजयाला गवसणी घातली.