महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली. महायुती सरकारला यंदाच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचे उर्वरित पैसे मिळाले. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली, तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले. आता लाडकी बहीण योजनेबद्दल अजित पवारांनी मोठी कबुली दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार लाडक्या बहिणींना दिलेली रक्कम परत घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार का? असा प्रश्न पडला आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या याजनेतील लाभार्थी महिलांना दिलेले पैसे परत घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवारांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले.
लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा आमच्याकडे मर्यादित वेळ होता. त्यामुळे आम्हाला बहिणींचे आधार कार्ड लिंक करता आले नाहीत. पण आता आम्ही खरोखर ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना याचा लाभ मिळणे आवश्यक आहे, त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलत आहोत, असे अजित पवार म्हणाले. पण या योजनेतील महिलांकडून रिकव्हरी करण्याचा अजिबात विचार नाही, असेही अजित पवारांनी म्हटले. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना देण्यात आलेले पैसे परत घेतले जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे.