Published on
:
03 Feb 2025, 3:49 am
Updated on
:
03 Feb 2025, 3:49 am
मुंबई : मुंबई शहराच्या विकासात महत्त्वाचा वाटा आणि मुंबईकरांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असणारी उपनगरीय लोकल आज, सोमवार ३ फेब्रुवारी रोजी १०० वर्षे पूर्ण करीत आहे. ३ फेब्रुवारी १९२५ साली चार डब्यांच्या पहिल्या विद्युत उपनगरीय लोकलने तेव्हाचे व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) ते कुर्लादरम्यान १६ किलोमीटरचा प्रवास केला होता. या घटनेला आज, सोमवारी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षानिमित्त मध्य रेल्वेने खास लोगोचे अनावरण केले आहे.
कोळशाचे इंजिन सोडून मध्य रेल्वेच्या व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला स्थानक या दरम्यान पहिली उपनगरीय रेल्वे विजेवर धावली. वाफेवर चालणाऱ्या इंजिनपासून १५०० व्होल्टेड डीसी प्रणालीवर धावणाऱ्या इंजिनचा चार डब्यांसह प्रवास सुरू झाला आणि भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला सुरुवात झाली. १९२८पर्यंत हार्बर मार्गावर चार डब्यांची लोकल आणि मुख्य मार्गावर आठ डब्यांची लोकल धावत होती. १९२५ ते २०२५ अशा लोकलच्या शंभर वर्षानिमित्त मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला उपनगरीय रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेचा पसारा सर्वाधिक आहे. दररोज सुमारे ३८ लाख प्रवासी मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करतात.
चार डब्यांची लोकल आता १५ डब्यांची आणि एसी लोकल झाली आहे. किफायतशीर आणि वेगवान प्रवासासाठी लोकलला मुंबईकरांची पहिली पसंती आहे. त्यामुळे लोकलला नेहमीच गर्दी असते. मुंबईकर रोजचे किमान चार ते पाच तास लोकलच्या प्रवासात खर्च करतात. भारतीय रेल्वेने शून्य कार्बन उत्सर्जन ध्येय निश्चित केले आहे. रेल्वेचे विद्युतीकरण हा अभियांत्रिकी प्रगतीतील एक मोलाचा टप्पा आहे. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी रेल्-वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले. यात १५०० व्होल्ट डीसीचे २५,००० व्होल्ट एसी हा वीजबचतीचा अतिशय महत्त्वाचा टप्पा २०१५मध्येच पूर्ण करण्यात आला. विद्युतीकरणानंतर आता हायड्रोजन उर्जेवर धावणाऱ्या इंजिनाकडे पावले टाकण्यात येत आहेत. रेल्वेने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हायड्रोजन उर्जेवर धावणाऱ्या १२०० अश्वशक्ती क्षमतेच्या इंजिनाच्या निर्मितीचे नियोजन केले आहे.
३ फेब्रुवारी १९२५ रोजी केवळ चार डबे घेऊन धावलेल्या या लोकलचा वेग ताशी ५० मैल इतका होता. त्यावेळी हे डबे लाकडी बनावटीचे होते. मध्य रेल्वे आधी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे ही कंपनी चालवायची. याच कंपनीने ही विजेवर धावणारी लोकल चालवली होती. तेव्हाच्या वृत्तपत्रात भारतात एका प्रदूषणरहित नवीन युगाची सुरुवात, अशा मथळ्याखाली बातम्या छापून आल्या होत्या. त्यानंतर १९२७ सालापासून मेन लाईन आणि हार्बर मार्गावर ८ डब्यांच्या लोकल धावू लागल्या. हार्बर मार्गावरील ओव्हरहेड वायरमधून पूर्वी १५०० व्होल्टचा (डीसी) विद्युत प्रवाह प्रवाहित होत होता. त्यात बदल करून तो २५ हजार (एसी) करण्यात आला. त्यानंतर २०१६ पासून हार्बर मार्गावर १२ डब्यांची लोकल चालविण्यात आली.