विधानसभा निवडणुकीत मजुरांना "अच्छे दिन':मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल
1 hour ago
1
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सर्वत्र आता वेग आला. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांसह स्टार प्रचारकही प्रचाराच्या कामाला लागले. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापल्या बंडखोरांना शमवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेकजण अजूनही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं प्रचारातही चांगलीच चुरस बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाची ताकद दाखवण्यासाठी मतदारसंघांमध्ये प्रचारसभांचे आयोजन केले जात आहे. त्यासाठी मजुरांना बोलावले जात असून महिला मजुरांना पाचशे तर पुरुषांना सातशे रुपये मिळत आहे. आपली रॅली अथवा सभेतील गर्दी मोठी दिसावी म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार प्रयत्न करत आहेत. यासाठी चक्क पैसे देऊन कार्यकर्ते बोलावले जात आहेत. दिवसभर मोलमजुरी करून जेवढा पैसा मिळत नाही, तेवढा काही तासांच्या प्रचार रॅलीमध्ये मिळत असल्याचं काही मजुरांनी सांगितलंय. त्यामुळं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांसाठी तरी मजुरांना 'अच्छे दिन' आले आहेत. मजूर वर्गासाठी हीच दिवाळी "निवडणुका म्हटलं की आमच्यासाठी दिवाळी असते. आम्ही मजुरीचं काम करतो. कधी काम मिळते, तर कधी मिळत नाही. मात्र, कुठल्याही निवडणुकीत आम्हाला प्रचारासाठी बोलावलं जातं. सभा, प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी चार ते पाच तासांचे पाचशे ते सहाशे रुपये दिले जातात. सोबतच नाश्ता आणि जेवणही दिले जाते. रोजची रोजंदारी म्हणून आम्ही देखील ते काम करतो. आम्हाला कुठल्याही पक्षाचे घेणे देणे नाही. पण पैसे मिळतात म्हणून आम्ही काम करतो, असे मजूर बोलत आहेत. मोठ्या नेत्यांच्या सभेमध्ये गर्दी असणं उमेदवाराला अपेक्षित असतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून सभेमध्ये खुर्च्या रिकाम्या असणे, सभेला गर्दी कमी असल्यावरून टीका केली जाते. त्यामुळे पक्षाची प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी उमेदवाराला अनेकदा पैसे देऊन गर्दी जमवावी लागते. गेल्या आठ दिवसांपासून प्रचार सभा, रॅली ठिकठिकाणी काढण्यात येत असताना कुणी फुकट सतरंजी उचलायला तयार नाही. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते वगळता महिलांना पाचशे तर पुरुषांना सातशे असा रोज देऊन मुकदमा मार्फत हजार पाचशे मजूर मागवण्यात येतात. सभा आटोपून तेच मजूर विरोधी गटाच्या रॅलीमध्ये तर पक्षाचे लेबल लावून गल्लोगल्ली मते मागण्यासाठी फिरत असतात काम न करता एक मजूर दीड ते दोन हजार रुपये रोज कमावत असल्याने बहुतांश ठिकाणी शेतातील कामे रखडली आहेत. दीडशे-दोनशे रूपये रोज परवडत नसल्याने मजूर वर्ग निवडणूक होईपर्यंत बिझी असल्याने कपाशी वेचणे, हरभरा निंदणी खुरपणी अशी कामे रखडली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे निवडणूक लवकर पार पडण्याची वाट बघत आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)