Published on
:
15 Nov 2024, 2:04 pm
Updated on
:
15 Nov 2024, 2:04 pm
डोंबिवली : विधानसभा निवडणूक काळात कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच सार्वत्रिक निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडावी, यासाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून ठाणे जिल्हा शहर आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशांनुसार कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण-डोंबिवली परिसरातून तब्बल 40 नामचीन गुंड आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या बदमाशांना तडीपार केले आहे.
या कारवाईमध्ये पोलिसांच्या अभिलेखावरील खतरनाक गुन्हेगार, शस्त्राच्या साह्याने दहशत माजवणारे, तसेच अनेक गुन्हे दाखल असलेल्या राजकीय नेत्या-पुढाऱ्यांचा समावेश आहे. कल्याण पोलिस परिमंडळ 3 अंतर्गत वाहतुकीला अडथळा आणणारे विक्रेते, उघड्यावर मद्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसह फरार गुन्हेगारांना शोधून त्यांच्या विरोधात उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशांवरून स्थानिक पोलिसांनी जोरदार मोहीम उघडल्याने गुंड-गुन्हेगारांची पळता भुई थोडी झाली आहे.
शहर आणि ग्रामीण भागात दररोज स्थानिक पोलिस, निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेले जवान पथसंचलन करत आहेत. त्यामुळे एकीकडे स्थानिक रहिवासी समाधान व्यक्त करत आहेत. मात्र दुसरीकडे गुंड, गुन्हेगार, भुरटे, चोरट्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
गस्त घालत असताना पोलिसांनी विविध ठिकाणी एकूण 55 बदमाशांना पकडून त्यांच्याकडून 51 प्रतिबंधित सुरा, तलवार, चाकूसारखी शस्त्रे जप्त केली. निवडणूक काळात कल्याणातील बाजारपेठ आणि खडकपाडा, तर डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध वाहनांमधून एकूण 79 लाख 30 हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मद्यपान करून किंवा मोबाईलवर बोलून वाहन चालविणे, वाहतुकीचे नियम धुडकावून वाहने चालविणाऱ्या 1 हजार 42 जणांवर नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून 12 लाखांचा दंड वसूल केला.
कल्याण परिमंडळ 3 हद्दीत 1 हजार 367 नागरिकांकडे वैयक्तिक सुरक्षेकरिता परवानाधारी रिव्हाॅल्व्हर आहेत. सार्वजनिक सुरक्षिततेचा विचार करून यातील 1 हजार 192 रिव्हाॅल्व्हर स्थानिक पोलिसांकडे जमा करण्यात आली आहेत. अजून 26 जणांची रिव्हाॅल्व्हर जमा करणे बाकी आहे. दारूबंदी, जुगार, गुटखा विक्री, तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 111 जणांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून 30 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत 3 हजार लिटर दारू, 31 किलो गांजा आणि 23 किलो एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवलीवर भिरभिरणार 40 ड्रोन
अवकाशात भ्रमण करून कल्याण-डोंबिवलीतील आठही पोलिस ठाण्यांच्या हद्दीवर वॉच ठेवण्याकरिता 40 ड्रोन खरेदी करण्यात आले आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्याला 4 ड्रोन देण्यात आले आहेत. या ड्रोनच्या माध्यमातून पोलिस आपापल्या हद्दीतील संशयास्पद हालचालींवर सूक्ष्म नजर ठेवणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी टिपणाच्या माध्यमातून दिली आहे.