Published on
:
21 Nov 2024, 12:55 am
Updated on
:
21 Nov 2024, 12:55 am
वेंगुर्ला : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातर्गत निवडणुकीला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण तालुक्यात अतिशय शांततेत मतदान झाले. वेंगुर्ले तालुक्यात 67 हजार 985 मतदार मतदानासाठी पात्र होते. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वा. या वेळेत एकूण 23 हजार 260 पुरूष आणि 22 हजार 144 स्त्रीया असे मिळून एकूण 45 हजार 404 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची एकूण टक्केवारी 66.79 टक्के एवढी आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील एकूण 93 मतदान केंद्रांवर बुधवार सकाळपासून मतदारांनी मतदान ासाठी गर्दी केली होती. सकाळी 7 ते 11 वा. या वेळेपर्यंत सरासरी 20.58 टक्के मतदान झाले होते. वेंगुर्ले शहरातील भटवाडी शाळा नं.1, वेंगुर्ले शाळा नं.3 आणि उभादांडा नं.3 या शाळेतील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने बराचवेळ मतदारांचा खोळंबा झाला. त्यामुळे मतदारांमधून नाराजी दिसून आली. या किरकोळ घटना वगळता तालुक्यात सर्वत्र अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.
सर्वच मतदान केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुक्यातील 93 ही मतदान केंद्रावर महायुती व महाविकास आघाडीतर्फे बुथ लावण्यात आले होते. अपक्ष उमेदवार विशाल परब व अर्चना घारे-परब यांचेही बुथ बहुसंख्य मतदान केंद्रांवर दिसून आले. माजी आमदार शंकर कांबळी यांनी शिरोडा-खर्डेवाडी शाळेत मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी होडावडा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.(Maharashtra assembly poll)
दुपारी 1 वाजेपर्यंत 13 हजार 700 पुरूष तर 11 हजार 887 स्त्रिया अशा मिळून 25 हजार 601 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी 3 पर्यंत 18 हजार 242 पुरुष तर 17 हजार 140 स्त्रिया अशा मिळून 35 हजार 382 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेंगुर्ला तालुक्यातील मतदानाची 66.79 टक्के एवढी होती. यात 23 हजार 260 पुरुष तर 22 हजार 144 स्त्रिया अशा मिळून एकूण 45 हजार 404 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.