Published on
:
18 Jan 2025, 12:20 pm
Updated on
:
18 Jan 2025, 12:20 pm
शिऊर : पुढारी वृत्तसेवा : वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मागील दोन महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बिबट्याला पकडण्यात सपशेल अपयश येत असल्याने आमच्या ग्रामीण भागातील तरुणांना बंदुकी व प्रशिक्षण द्यावे, आम्ही बिबट्याचा बंदोबस्त करतो. शेतीपंपासाठी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, असे निवेदन हिंदवी जनक्रांती सेनेचे अध्यक्ष अजय साळुंके व शेतकऱ्यांच्या वतीने वैजापूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आणि महावितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता यांना दिले.
तालुक्यातील कवीटखेडा परिसरात परप्रांतीय मजूर कापूस वेचत असताना त्यांची मुले बांधावर खेळत होती.त्यातील एक ५ वर्षीय मुलाला शेजारील ज्वारीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. यात त्या मुलाचा मृत्यू झाला. तर तलवाडा परिवारात एका चार वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामुलीची परिस्थिती आता व्यवस्थित आहे.
वनविभागाला बिबट्या पकडण्यात अपयश येत असल्याने व बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलांचा बळी जात आहे. यामुळे संतप्त होत हिंदवी जनक्रांती संघटना व शेतकरी यांनी वनविभागावर रोष व्यक्त करत आमच्या ग्रामीण भागातील तरुणांना व निवृत्त सैनिकांना बंदुकी द्या, आम्ही बिबट्याचा बंदोबस्त करतो. तसेच महावितरण विभागाने बिबट्याच्या सतत होणाऱ्या हल्ल्याची परिस्थिती लक्षात घेता दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये व मृत झालेल्या कुटुंबाला ३० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा शिऊर परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलनात उतरतील, असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने हिंदवी जनक्रांती सेनेचे अजय साळुंके यांच्या वतीने दिला.