विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्याने ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचा सूर महाविकास आघाडीसह राज्यातील अनेक पक्ष संघटनांकडून ऐकायला मिळत असून, या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातून व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांच्या मोजणीसाठी निवडणूक विभागाकडे तक्रार आली आहे. या संदर्भात अपक्ष उमेदवाराने दिलेला अर्ज नमुन्यात नसल्याने तो फेटाळत नव्याने नमुन्यात अर्ज दाखल करण्याचे त्या उमेदवाराला सांगण्यात आले आहे.
शेकडो मतदारसंघात प्रत्यक्ष मतदान आणि मशीनमध्ये झालेल्या मतदानात तफावत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. काही मतदान केंद्रावर सहा मशीनमध्ये एकसमान मते असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, ईव्हीएमसंदर्भात संशय असल्याने बहुतांश पक्षांनी ईव्हीएममध्ये घोटाळा करून महायुतीच्या उमेदवारांनी जागा जिंकल्या असल्याचा मतप्रवाह राज्यात आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कन्नड मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठयांची मोजणी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील निवडणूक विभागाकडे तसा अर्जही केला आहे. दरम्यान, हा अर्ज नमुन्यामध्ये नसल्याने तो फेटाळण्यात आला असून, नमुन्यात अर्ज देण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. कन्नड मतदारसंघातील एका व्यक्तीनेही अर्ज देत अशी मागणी केली होती, मात्र ती व्यक्ती उमेदवार नसल्याने त्यांना मागणी करण्याचा अधिकार नसल्याने त्यांचा अर्जही फेटाळण्यात आला आहे.
या संदर्भात निवडणूक उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्याकडे दोन व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांची मोजणी करण्यासंदर्भात दोन अर्ज आले आहेत. निवडणुकीत पराभूत झालेले क्रमांक दोन आणि तीनच्या उमेदवारांचा अशी मागणी करण्याचा अधिकार आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघातील पराभूत झालेले अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव दुसऱ्या क्रमांकावर असल्याने त्यांना हा अधिकार आहे. दुसरी तक्रारी करणारी व्यक्ती उमेदवार नसल्याने त्यांना हा अधिकार नाही. मागणी करणाऱ्या उमेदवारांना विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्राच्या म्हणजेच ईव्हीएमच्या 5 टक्के व्हीव्ही पॅट कुठले असावे, याची मागणी करावी लागते. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी केलेला अर्ज साध्या कागदावर होता. त्यात कुठल्या व्हीव्हीपॅटची मोजणी करायची आहे, याची माहिती नव्हती. त्यामुळे असा अर्ज ग्राह्य धरला जात नाही. तो अर्ज नमुन्यात करावा लागतो. तशी माहिती त्यांना देण्यात आली आहे.
भरमसाट शुल्क आणि जीएसटीही !
उमेदवारांकडून व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठयांची मोजणी करण्याच्या मागणीसंदर्भात निकष लावण्यात आलेले आहेत. याशिवाय त्यासाठी भरमसाट शुल्काची आकारणी करण्यात आलेली आहे. त्यावर पुन्हा जीएसटी आकारला जात आहे. उमेदवाराने व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांच्या मोजणीची मागणी केल्यास त्या उमेदवारास त्या मतदारसंघातील एकूण ईव्हीएमपैकी 5 टक्के ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांच्या मोजणीची मागणी करता येते. यासाठी त्या उमेदवाराला कुठल्या मतदार केंद्रावरील व्हीव्हीपॅटची निवड करायची याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी प्रत्येक व्हीव्हीपॅटला 40 हजार आणि 7 हजार 200 रुपये जीएसटी असे एकूण 47 हजार 200 रुपये शुल्क म्हणून द्यावे लागते. म्हणजे एकूण ईव्हीएमच्या 5 टक्के व्हीव्हीपॅटसाठी या शुल्काची रक्कम लाखापर्यंत जाते.