दोन्ही शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करू शकतो, अशा आशयाचं विधान शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलं होतं. शिरसाट यांच्या या विधानावरून शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजपमधूनही प्रतिक्रिया आल्या आहेत. शिरसाट यांच्या या विधानावरून आता शिंदे गटातच जुंपली आहे. शिंदे गटाचे मंत्री योगेश कदम यांनी शिरसाट यांच्या विधानावर थेट भाष्य करत शिरसाट यांच्या विधानाला महायुतीत महत्त्व नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिरसाट आता काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्षाची भूमिका हे आमचे मुख्यनेते एकनाथ शिंदे ठरवतात. एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला, त्यावेळी आम्ही पक्षाच्या निर्णयाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना दिले. इतर कुणालाही अधिकार दिले नाहीत. त्यामुळे संजय शिरसाट काय म्हणतात याला महायुतीत महत्त्व नाही. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, असं योगेश कदम यांनी स्पष्ट केलं.
ठाकरेंचे आमदार संपर्कात
उबाठाच्या आमदारांना खरंतर निधी कुठून मिळणार आहे? पुढच्यावेळी निवडून कसे येणार? ही चिंता भेडसावत आहे. आम्ही सत्तेत आहोत. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पाठी सर्व आमदारांची एकजूट आहे. त्यामुळे आम्हाला कसलीही चिंता नाही. आमच्या आमदारांचीही चिंता नाही, असं सांगतानाच उबाठाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा योगेश कदम यांनी केला.
त्यांचा संजय राऊत होऊ नये
संजय शिरसाट यांच्या विधानावरून मंत्री नितेश राणे यांनी थेट इशारा दिला आहे. दोन्ही शिवसेनेला एकत्र आणण्याचे त्यांनी प्रयत्न करत राहावे. पण एकनाथ शिंदे यांचं काय मत आहे? अन्य आमदारांचं काय मत आहे? याचा विचार करावा. संजय शिरसाट आमचे मित्र आहेत. फक्त त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये हीच अपेक्षाच आहे, असा सूचक इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
महान माणूस आहे तो…
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय शिरसाट हे अटलबिहारी वाजपेयीच आहेत. महान माणूस आहे तो. महान माणूस आहे. त्यामुळे ते तसं करू शकतात. त्यांच्या ज्या भावना आहेत, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. ते काही करू शकतात. मोठा माणूस आहे तो. ते शरद पवार आणि अजित पवार यांना एकत्र आणतील. पण चांगली गोष्ट आहे. त्यांचे जे विचार आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.
शिरसायट काय म्हणाले होते?
संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची गरज व्यक्त केली होती. मला वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची गरज आहे. त्यांनी (उद्धव ठाकरे) दोन पावलं मागे गेलं पाहिजे हे माझं मत आहे. ते जातील की नाही शक्यता कमी आहे. इतरांना जवळ करतील पण एकनाथ शिंदे आणि त्यांचं सूत जमेल असं सध्या तरी वाटत नाही, असं सांगतानाच माझं एक लिमिट आहे. मी शिंदेंकडे जाऊ शकतो. त्यांना एकत्र येण्याबाबत बोलू शकतो. पण तुला हा शहाणपणा करण्याची गरज काय? असं शिंदे म्हणाले तर मला थांबावं लागेल, असं शिरसाट म्हणाले होते.