शिरूरमधील रस्त्यांसाठी 20 कोटींचा निधी मागितला: शितोळेFile Photo
Published on
:
19 Jan 2025, 6:21 am
Updated on
:
19 Jan 2025, 6:21 am
शिरूर: देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर त्यांना भेटून शिरूर तालुक्यातील रस्त्यासाठी जवळपास 20 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मागितला. त्यांनी तो देण्याचे मान्य केला असल्याची माहिती जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दौलतनाना शितोळे यांनी मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व या संदर्भातील निवेदन दिले. यात तालुक्यात गुणाट ते शिंदोडी हा पाच किलोमीटर रस्ता तसेच शिंदोडी येथील वाळुंज वस्तीचा तीन किलोमीटर रस्ता तयार करणे आणि मांडवगण फराटा येथील रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा, यासाठी मागणी केली होती. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांचीदेखील भेट घेऊन निवेदन दिल्याची माहिती दौलतनाना शितोळे यांनी दिली.
कोणाच्या रोजीरोटीवर लाथ मारू नये
‘जिरवा-जिरवी’च्या राजकारणाला आपला विरोध असून माजी आमदार अशोक पवार यांच्या पराभवानंतर काही पदाधिकारी त्यांच्या जवळच्या लोकांची कामे एमआयडीसीमधून काढून घेण्याचे प्रयत्न करीत आहेत; मात्र आपला त्याला विरोध असून असे कुणी करत असेल तर मी त्याला पहिल्यांदा विरोध करेल. राजकारण वेगळे असते, कोणाच्या रोजीरोटीवर लाथ मारू नये या विचाराचा मी असल्याचे दौलतनाना शितोळे यांनी सांगितले.
आगामी 2029 साठी आपण इच्छुक
सन 2024 ते 2029 या कालावधीत या महायुतीच्या माध्यमातून व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात भरपूर विकासकामे करणार असून समाजातील वंचित घटक व अठरापगड जातींचे काम करत आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक असल्याचे दौलतनाना शितोळे यांनी सांगितले.