Published on
:
18 Jan 2025, 7:25 am
Updated on
:
18 Jan 2025, 7:25 am
शेअर बाजारात अनेक शासकीय अधिकारी व कर्मचार्यांनी उत्पन्नापेक्षा अधिक गुंतवणूक केल्याचा आरोप एका शेअर व्यावसायिकाने केला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याच्या चौकशीची केल्याचे एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल केले आहे.
तालुक्यातील शेअर मार्केट घोटाळा हा राज्यात गाजला आहे. या व्यवसायात अनेक गोरगरीब ठेवीदारांसह इतरांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करून व्यावसायिकांनी धूम ठोकली. एकामागे एक असे महिनाभरात सर्वच व्यावसायिक गायब झाले. त्यामुळे व्याज नाही मिळाले तरी चालेल; किमान ठेव द्यावी, अशा अपेक्षा होऊ लागल्या. मात्र, ठेव परत मिळण्याची अपेक्षा मावळल्याने अखेर गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू झाले.
पोलिसांकडे आत्तापर्यंत असे 30 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 17 गुन्ह्यांतील 23 आरोपींना अटक करण्यात आली. इतर अद्यापही फरार असल्याचे दाखविण्यात येत आहे. अटकेमधील काहींची जामिनावर मुक्तता झाली आहे.
शेअर फसवणुकीचे गुन्हे दाखल होताना अगोदर त्यातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी धडपड केली. त्यानंतर हळूहळू त्याची गंभीरता कमी झाल्याची चर्चा आजही ठेवीदारांत सुरू आहे.
या शेअर व्यवसायात जादा परताव्याच्या आमिषाने गोरगरीब, व्यावसायिक, मजूर, शेतकरी, व्यापारी यांची ठेव होती. त्याचबरोबर वेगवेगळ्या खात्यातील अधिकारी व कर्मचार्यांनाही लालूच न सुटल्याने त्यांनीही मोठ्या प्रमाणात नातेवाइकांच्या नावे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्याचे आता समोर येऊ लागले आहे. याबाबत एका शेअर व्यावसायिकानेच हा आरोप केला असून, त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याच्या चौकशीची मागणी केली आहे.
गेल्या तीन-चार वर्षापासून हा व्यावसायिक एक प्रोप्रायटरशीप फर्म चालवत होता. त्याच्यामार्फत काही नागरिकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. त्यावर अनेकांना चांगल्या प्रकारे परतावाही मिळाला आहे. परंतु अनेक सरकारी कर्मचारी आणि अधिकार्यांनीही यामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम त्यांच्या आणि इतर नातेवाइकांच्या नावाने गुंतवणूक केली. ही गुंतवणूक केलेल्या रकमेविषयी विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याने, तसेच गुंतवणूक करण्यात आलेल्या रकमेचा आकडा हा त्यांच्या उत्पन्नापेक्षा खूप अधिक आढळून येत असल्याचा आरोप या व्यावसायिकाने केला आहे. उपलब्ध सर्व पुराव्यांसहित ज्यांनी नातेवाइकांच्या नावाने गुंतवणूक केलेली आहे अशा लोकसेवकांची माहिती व उपलब्ध कागदपत्रे पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केल्याचे इंस्टाग्रामवर व्हायरल केले आहे.
अनेक लोकसेवकांनी कर्तव्यावर असलेल्या ठिकाणी स्थानिक लोकांची बँक खाते वापरून व्यवहार केले आहेत. त्यासंबंधी स्पष्ट पुरावे आपणाकडे उपलब्ध आहेत, परंतु कोणतीही तक्रार न करण्यासाठी तसेच सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी प्रचंड दबाव आणला जात आहे. तसेच खोटे गुन्हे दाखल करून मला अडवण्याचा प्रयत्न केला जात असून, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामधील तरतुदीनुसार संबंधित लोकसेवकांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केल्याचे व्हायरल झाले आहे.