मुंबईत अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या असून गोरेगावामध्ये अक्षरश: हादरवणारी एक घटना घडली आहे. घरातून बाहेर पडलेल्या एका 20 वर्षीय तरूणीला फसवून अनोळखी रिक्षा चालकाने तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्यासोबत जे घडलं ते आई-वडिलाना समजलं तर ते आपल्याला मारतील या भीतीपोटी त्या तरूणीने तिच्याच प्रायव्हेट पार्टमध्ये ब्लेड आणि काही दगड टाकले होते, असेही समोर आले आहे. यामुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक राजरतन सदाशिव वायवळ ( वय 32) याला खैरपाडा, वालीव येथून अटक केली आहे. वनराई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पीडित मुलीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण ?
गोरेगाव परिसरात एका तरूणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सर्जिकल ब्लेड आणि खडे सापडले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी त्या तरूणीला केईएममध्ये दाखल करून घटनेचा तपास सुरू केला. मात्र या प्रकरणी बरीच धक्कादायक माहिती समोर आली . आधी त्या तरूणीने असा दावा केला की ती अनाथ असून तिचे संगोपन वाराणसीतील एका काकांनी केले होते. 20 जानेवारीला काकासोबत विमानाने मुंबईत आली होती असा दावा तिने केला होता. मात्र नंतर अशी माहिती समोर आली की तिचे आई-वडील जिवंत असून ते नालासोपारा येथेच राहतात.
पोलिसांना तिच्या घरच्या सदस्यांबद्दल माहिती मिळाल्यानंतर तरूीने सांगितलं की तिचे वडील एक फळ विक्रेते आहेत आणि आई घरकाम करणारी असून ती परिसरात छोटं मोठा काम करते. तिचे वडील रागीष्ट स्वभावाचे आहे त्यांनी अनेकदा तिला आणि तिच्या आईला मारहाण केली आणि तिच्या भावंडांसोबत वारंवार भांडण करायचे . 21 जानेवारी रोजी वडिलांशी भांडण झाल्यानंतर ती तरूणी घराबाहेर निघून गेली. नंतर ती नालासोपारा स्टेशनला गेली जिथे तिची एका ऑटो चालकाशी भेट झाली. त्याला तिने तिच्या कौटुंबिक समस्यांबद्दल आणि आत्महत्येच्या विचारांबद्दल सांगितले .
फसवून नेलं आणि केला अत्याचार
ऑटो चालकाने तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत तिला अर्नाळा येथे नेले आणि तेथे त्याने तिच्यावर दोनदा अत्याचार केला, असा आरोप तरूणीने केला. मात्र रिक्षावाल्याने आपल्या सोबत केलेलं कृत्य समजतात आई-वडील मारतील या भीतीने तरुणीने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये स्वत:च ब्लेड आणि काही खडे टाकून घेतले. पोलिसांसमोर तिने हे कबूल केलं. नालासोपारा रेल्वे स्थानकावर पोहोचली तेव्हा घरचे काय म्हणतील याची तिला भीचा वाटली. त्यामुळेच तिने ब्लेड आणले आणि तिच्या योनीमध्ये काही दगड टाकले. वेदना होत असताना तिने लोकल ट्रेनने राम मंदिर स्टेशन गाठले तेथून वनराई पोलिसांनी तिला सोबत नेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पीडित मुलीच्या जबाबाच्या आधारे तपास सुरू केला असता, ती मुलगी पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे त्यांना समजले. अखेर कसून तपास केला असता सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ऑटो रिक्षा चालकाला ताब्यात घेतले आहे आणि तरूणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.