संतापजनक! ड्रेनेजलाइनमधूनच जलवाहिन्याही Pudhari
Published on
:
30 Jan 2025, 6:54 am
Updated on
:
30 Jan 2025, 6:54 am
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे: दूषित पाण्यामुळे गुलेन बॅरी सिंड्रोमचा शहरात प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आरोग्यमंत्र्यांनी बाधित भागातील जलवाहिन्या आणि ड्रेनेजलाइनची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. नांदोशी, खडकवासला, किरकटवाडी, नांदेड गावठाण, नांदेड फाटा या परिसरातील काही जलवाहिन्या ड्रेनेजलाइनमधून गेल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. मुख्य रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी तुंबणे, नळकोंडाळे खड्ड्यात असणे अशा समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याने नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाकडून महापालिकेला सूचना देण्यात आल्या. त्यानुसार, पाणीपुरवठा विभागाकडून नवीन वाहिन्या टाकण्याचे आणि जुन्या दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, महापालिकेची ही कार्यवाही म्हणजे उशिराने सुचलेले शहाणपण असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
पुणे शहर आणि नव्याने समाविष्ट 23 गावांमध्ये पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागाने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा विभागाने विहिरींचे आच्छादन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून टर्पोलिन आणि फेन्सिंग करण्यात यावे. विविध भागांमध्ये पाणीपुरवठा करणार्या टँकरचालकांची बैठक आयोजित करून त्यांना सूचना देण्यात याव्यात, असेही सांगण्यात आल्या आहेत.
जलवाहिन्यांची धोकादायक सद्य:स्थिती
नांदोशी गावचा मुख्य रस्ता (अर्चना पार्क सोसायटी शेजारी)ड्रेनेज पाणी तुंबते/दूषित पाण्याची शक्यता.
खडकवासला वॉर्ड क्र. 1 जलवाहिनी ओढ्यातून गेली आहे
किरकटवाडी लक्ष्मीनगर जलवाहिनी ड्रेनेज लाइनमधून गेली आहे.
नांदेड गावठाणजलवाहिनी ड्रेनेजला लागून आहे.
नांदेड फाटा जलवाहिनी ड्रेनेजलाइनमधून गेली आहे
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. नांदोशी, किरकटवाडी, नांदेड फाटा आदी ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नवीन जलवाहिन्या टाकण्याचे आणि जुन्या दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
- प्रसन्नराघव जोशी, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका.