विधानसभा निवडणुकीसाठी आता मतदान पार पडलं आहे. प्रशासन आता मतमोजणीची तयारी करत आहे. असं असताना आता छत्रपती संभाजीनगर येथून मोठी बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. निवडणुकीत होणाऱ्या काळाबाजाबाबत त्यांनी मोठा दावा केला आहे. विशेष म्हणजे इम्तियाज जलील यांनी भर पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवत गंभीर आरोप केले आहेत. इम्तियाज जलील यांनी भाजपचे अतुल सावे यांच्यावर ‘नोट फॉर व्होट’चा आरोप केला आहे. मतांसाठी भाजपने पैशांचं वाटप केल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
“संबंधित व्हिडीओतील व्यक्तीचं नाव अरविंद दोनगावकर असं आहे. ते भाजपचे एका सेलचे प्रमुख आहेत. त्यांचं कार्यालय हे जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या एकदम समोर आहे. तिथे ह्यांनी मुस्लीम समाजाच्या महिलांना रिक्षेत भरुन आणलं. तिथे त्यांच्या कार्यालयात बसून मुस्लीम महिलांना प्रत्येकी 1 हजार रुपये, जे जास्त मागत होत्या त्यांना प्रत्येकी 2 हजार रुपये दिले”, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला.
पहिल्या व्हिडीओत काय?
“अरविंद दोनगावकर हे पेशाने वकील आहेत. आमच्या टीमने तिथे जावून हे व्हिडीओ बनवले आहेत. तिथे जो मुलगा आहे त्याच्या हातात वोटिंग कार्ड आहे. व्हिडीओतली व्यक्ती अरविंद दोनगावकर आहेत. ते कायद्याचे रक्षक आहेत. पण ते आपल्या कार्यालायत सकाळपासून दुपारपर्यंत महिलांना पैशांचं वाटप करत होते. तिथला मुलगा दलालीचं काम करत होता. त्याला कमिशन दिलं जात होतं. मतदानाच्या दिवशी हा सगळा प्रकार सुरु होता”, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. “जवाहरनगर पोलीस ठाण्याचा सीसीटीव्ही तपासला गेला तर त्या दिवशी किती मुस्लिम महिला त्यांच्या कार्यालयात गेल्या याची माहिती मिळेल”, असं इम्तियाज जलील म्हणाले.
हे सुद्धा वाचा
दुसऱ्या व्हिडीओत काय?
“दुसरा व्हिडीओ हा भारतनगरचा आहे. तिथे संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी आम्हाला माहिती मिळाली होती. भाजपचा दलित नेता आहे. जालिंदर शेंडगे असं त्याचं नाव आहे. तिथे तो अचानक बाहेर राहणाऱ्या लोकांची झुंडच्या झुंड घेऊन आला. मला तिथल्या अमुस्लिम नागरिकांनी फोन करुन याबाबत माहिती दिली की, जालिंदर शेंडगे ज्या लोकांना घेऊन आला आहे ती लोकं संबंधित परिसरातील नसून बोगस मतदानासाठी आली आहेत”,असं जलील म्हणाले.
“मी तिथे गेलो तेव्हा पाहिलं जालिंदर शेंडगे तिथे होता. मोठी लाईन लागलेली होती. मी एका पोलिंग बुथच्या आतमध्ये शिरलो. तेव्हा मला तिथे शिवसेनेचा आणि काँग्रेसचा जो कार्यकर्ता होता त्याने सांगितलं की, जी महिला तिथे आली आहे तिच्याकडे काहीच ओळखपत्राचा पुरावा नव्हता. माझ्यासोबत काही लोक होते. आरडाओरड सुरु झाली तेव्हा ती महिला मतदान करुन बाहेर पडत होती. तिथे एक महिला पोलीस कर्मचारी होती. ती महिला पोलीस इशाऱ्याने त्या महिलेला बाहेर जायला सांगत होती. मी महिला पोलीस कर्मचाऱ्याला बोललो की, तुम्ही त्या महिलेला का सोडत आहात? ही गोष्ट जालिंदरच्या लक्षात आली. महिला पोलिसाने त्या महिलेला जाऊ दिलं”, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला.