सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ अखंड मराठा समाजाचा सोलापूर जिल्ह्याच्यावतीने बुधवार 22 जानेवारी रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोलापूर येथील समन्वयक रवी मोहिते यांनी दिली. या मोर्चास मराठा आंदोलन मनोज जरांगे-पाटील, आमदार सुरेश धस यांच्यासह देशमुख व सूर्यवंशी यांचे कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहेत.
याबाबत माहिती देण्यासाठी मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यास माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, कुर्दूवाडीचे संजय टाणपे, संभाजी ब्रिगेडचे दीपक वाडदेकर, किरण घाडगे, स्वराज पक्षाचे महादेव तळेकर, किरण भोसले, दिगंबर सुडके, विनोद लटके, महेश पवार, आकाश पवार, बंटी भोसले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहेच, परंतु परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची देखील पोलीस कोठडीत हत्याच केली असल्याचा आरोप रवी मोहिते यांनी केला. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होण्यासाठी तसेच यातून आरोपींची नावे वगळली जाऊ नयेत यासाठी आक्रोश मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती तर दीपक वाडदेकर यांन दिली.
दरम्यान, सदर मोर्चा बुधवार 22 रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघणार आहे. या आक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच खासदार बजरंग सोनवणे, संभाजीराजे छत्रपती, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, दीपक केदार हे देखील उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.